न.पं.चा कारभार वाऱ्यांवर : पदाधिकारीही मूग गिळून गप्प अर्जुनी-मोरगाव : ऐन मार्च महिन्यात गावाच्या विकासाची कामे करण्याचा काळ असताना नगर पंचायतच्या मुख्याधिकारी रजेवर गेल्या. अखर्चित निधी परत जाण्याची वेळ आल्यामुळे विकासकामे तसेच नागरिकांची विविध कामे रखडली आहेत. प्रशासन मात्र निंद्रावस्थेत आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील नगर पंचायतच्या मुख्याधिकारी किरण बगडे या १४ मार्चपासून रजेवर गेल्या आहेत. त्यांचे जागेवर अद्यापही कुणाचीच नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विविध कामे रखडली आहेत. अखर्चित निधीचा वापर कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३१ मार्चपूर्वी स्थानिक बाजाराचा लिलाव करावयाचा आहे. नगर पंचायतचा अर्थसंकल्प सादर करण्याचे महत्त्वपूर्ण काम आहे. नगर पंचायतमध्ये दोन कोटी ७० लाख रुपये शिल्लक निधी आहे. नमुना आठची कामे रखडली आहेत. यापूर्वी झालेल्या ठरावांची अंमलबजावणी झाली नाही. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आणखी निधी येईल. मात्र नगर पंंचायत क्षेत्राचा विकास आराखडा तयार नाही. रमाई आवास योजनेचे प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे सादर झाले नाहीत. घर कर वसुलीची मोहीम अद्याप हाती घेण्यात आली नाही. या सर्व प्रकारांमुळे गावाचा विकास खुंटला आहे. मार्च महिन्याचा प्रारंभ नगराध्यक्षा विरुद्धचा अविश्वासात गेला. त्यानंतर विकासकामे होतील अशी अपेक्षा नगरवासीयांची होती. मात्र ती फोल ठरत आहे. त्यानंतर मुख्याधिकारी रजेवर गेले असताना प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती नाही. मुख्याधिकारीच नसल्याने नगर पंचायतचे पदाधिकारी सुद्धा मूग गिळून आहेत. (तालुका प्रतिनिधी)नगर पंचायत सत्तारुढ होऊन दीड वर्ष पूर्ण होत आहे. निवडणुकीपूर्वी नगराच्या विकासाची स्थिती जशी होती तशीच आहे. सुरुवातीला नायब तहसीलदारांकडे प्रभार होता. त्यानंतर नियमित मुख्याधिकारी आले. मात्र त्या नवीन असल्याने कामात व्यत्यय येत गेला. ऐन मार्च महिन्यात त्या रजेवर गेल्यामुळे अखर्चित निधी विकासकामासाठी कसा वापरायचा हा प्रश्न आहे. ही बाब जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना सांगितली; मात्र याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. प्रभारी मुख्याधिकारी देऊ अशी कोरडी आश्वासने दिली जातात. यामुळे विकास कामे होत नाही. अखर्चित निधी असल्याने शासन नवीन निधी कसा देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.-पौर्णिमा शहारेनगराध्यक्ष
मुख्याधिकारी रजेवर, विकासकामांना खीळ
By admin | Updated: March 26, 2017 00:51 IST