बोंडगावदेवी : पंचायत समिती कार्यालयांतर्गत ग्रामीण भागातील बोअरवेलची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी ८ हातपंप देखभाल-दुरुस्ती यांत्रिकांची नियुक्ती केली आहे. अति दुर्गम भागातील हातपंप दुरुस्त करणाऱ्या या यांत्रिकांना मागील ६ महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील हातपंप दुरुस्ती करण्याचे काम हातपंप यांत्रिकांना वेळी-अवेळी करावे लागते. हातपंप देखभाल करण्याचा मेहनतानावर त्या यांत्रिकाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यांत्रिकांना मानधनासाठी मिळणारा निधी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पुरविला जात असल्याचे समजते. गेल्या ६ महिन्यांपासून हातपंप यांत्रिकांना मानधन मिळाले नसल्याने, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. हातपंप यांत्रिकांना नियमित मानधन मिळण्यासाठी संबंधित विभागाची डोळेझाक होत असल्याची नित्याचीच बाब आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय करून, देणाऱ्या हातपंप यांत्रिकांना त्यांच्या कामाचा मोबदला दर महिन्यापोटी मिळण्यासाठी संबंधित विभाग गांभीर्याने दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. गावपातळीवर काम करणाऱ्या या हातपंप यांत्रिकांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना शुक्रवारी (दि.२६) लेखी निवेदन देऊन मानधन देण्याबाबत आग्रही मागणी केली. जिल्हा परिषदेच्या अन्य कोणत्या एका निधीतून मानधन देण्यासंबंधी कारवाई करावी, अशी मागणी हातपंप यांत्रिकांनी या निवेदनातून केली आहे.