विजय मानकर सालेकसा पावसाळी पिकनिकसाठी विदर्भातील महत्वाचे ठिकाण ठरलेल्या सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल धबधब्याला आता उधान येत आहे. उंच पहाडावरून धो-धो करीत खाली कोसळणाऱ्या धबधब्याचा रोमहर्षक आवाज आणि तेथील साहसी खेळ पाहून पर्यटकांच्या अंगात नवीन उत्साह संचारल्याशिवाय राहात नाही. त्यामुळेच धबधब्याचे पाणी जसजसे वाढत आहे तसतशी पर्यटकांची पावलं हाजराफॉलकडे वळत आहेत. त्यातल्या त्यात आठवडाभरातील कामाचा ताण घालविण्यासाठी रविवारी सहकुटुंब सहल काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसे पाहिले तर हाजराफॉलला वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते, परंतु पावसाळ्यात या स्थळाला भेट देणे म्हणजे शिणलेले मन आणि शरीराला नवीन उर्जा देण्यासारखे असते. परिसरातील हिरवळ, घनदाट वन व लांब पर्वतरांगा तसेच धबधब्याच्या दुसऱ्या बाजुने रेल्वेरूळाकडे गेल्यानंतर बोगद्यातून धावणाऱ्या रेल्वेचा आवाज आणि दुसरीकडे उंच पहाडावरून पडणाऱ्या धबधब्याचा कर्णप्रिय आवाज पर्यटकांना आकर्षित केल्याशिवाय राहात नाही. प्रवेशद्वारावरूनच प्रत्येक पर्यटकाची हाजराफॉल गाठण्याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. या सगळ्या आनंदमयी वातावरणात आकाशातून वाऱ्याच्या झोतानुसार वाहणारे ढग, कधी ऊन तर कधी पाऊस असे वातावरण उत्साही पर्यटकांसाठी ‘सोने पे सुहागा’ ठरत आहे. उंच पहाडावरून पडणारा धबधबा जेव्हा खाली तलावात वेगाने पडतो तेव्हा तलावात शेकडो कारंजी निर्माण होतात. त्या पाण्याचे असंख्य तुषार धुरासारखे परिसरात उडत असतात. ते चार ते पाचशे मिटर दूरपर्यंत त्याचा हळूवार आणि आल्हाददायक स्पर्श शरीराला रोमांचित केल्याशिवाय राहात नाही. विशेष म्हणजे येथील नैसर्गिक शुद्ध हवेमुळे शरीराला वेगळाच ताजेपणा जाणवतो. रविवारची पहिली पसंती समस्त कर्मचारी-अधिकारी वर्ग, शाळा-महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी संपूर्ण आठवडाभर व्यस्त असतात. कामाच्या ताणामुळे शारीरिक मानसिक थकवा आलेला असतो. अशात विकेंड स्पेशल घालविण्यासाठी शनिवारी आणि रविवारी लोक घराबाहेर पडून सहकुटूंब जाण्यासाठी लोक हाजरा फॉलला पहिली पसंती देत आहेत. दर शनिवारी, रविवारी येथे पर्यटकांची संख्या सात ते आठ पटीने वाढते. पर्यटकामध्ये नवदाम्पत्य, प्रेमी युगल, कुटूंबासह आलेले लोक, विद्यार्थी समूह तसेच एका कार्यालयात काम करणारे कर्मचारी आपला विकेंड घालविण्यासाठी येत असतात. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यासह विदर्भातील दूरदूरचे लोक तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील पर्यटक सुटी घालविण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे.
हाजराफॉलला उधाण
By admin | Updated: July 17, 2016 00:13 IST