गोंदिया : दहावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गायत्री तक्कतकुमार पारधी या विद्यार्थिनीचा सत्कार तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील नालंदा बुद्ध विहारात शनिवारी (दि.४) करण्यात आला. गायत्रीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट केअर असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवचरण शहारे यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट केअर असोसिएशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या होत्या. उपक्रमातून मिळणाऱ्या भेटवस्तूचा लाभ घेण्यासाठी जाती-धर्माचे बंधन नव्हते. त्यासाठी दहाव्या वर्गातील विद्यार्थी हा चिरेखनी या गावातील रहिवासी असावा. तसेच त्यांनी मार्च-२०१४ च्या बोर्डाच्या परीक्षेत कमीत कमी ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. यापेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास या उपक्रमातून मिळणाऱ्या भेटवस्तूचा लाभ मिळणार नाही, असे डॉ. आंबेडकर स्टुडंट केअर असोसिएशनचे शशांक शहारे यांनी कळविले होते. त्यासाठी चिरेखनी गावातील दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या जवळपास १८ विद्यार्थ्यांनी आपल्या नावांची नोंदणी करून घेतली होती. मात्र यापैकी केवळ गायत्री तक्कतकुमार पारधी या एकाच विद्यार्थिनीने ७५ टक्केपेक्षा अधिक म्हणजे ८७ टक्के गुण मिळविले. तसेच तिने गणित विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविले. त्याबद्दल शनिवारी नालंदा बुद्ध विहारात ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक शिवचरण शहारे यांच्या हस्ते तिला सायकल भेट देण्यात आली. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदूकुमार बिसेन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव कोटांगले होते. पाहुणे म्हणून शिवचरण शहारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदूकुमार बिसेन, शिक्षक शैलेंद्रकुमार कोचे, तक्कतकुमार पारधी, प्रमोद शहारे, डॉ. ब्रह्मदास वालदे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन, स्पर्धेचे युग, उच्चशिक्षणाची गरज, शिक्षणाबाबत जनजागृती आदी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून संचालन देवानंद शहारे यांनी केले. आभार शैलेंद्र कोचे यांनी मानले. कार्यक्रमासाठी घनश्याम जांभूळकर, सुभाष जांभूळकर, सरजू शहारे, परागसिंह शहारे, कुणाल शहारे, डिगांबर जांभूळकर, किशोर सरोजकर, विष्णूदास जांभूळकर, वच्छला वालदे, चंद्रकला नंदेश्वर, पौर्णिमा शहारे, निशा शहारे, मंदा जांभूळकर, अविनाश शहारे, रूपा उके, भाग्यश्री शहारे आदी समाजबांधव व ग्रामस्थांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)
नालंदा बुद्ध विहारात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार
By admin | Updated: October 5, 2014 23:07 IST