डोंगरे यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना चार मागण्यांचे निवेदन सादरगोंदिया : गौण खनीज विकासा निधीतून रस्त्यांची त्वरीत दुरूस्ती करावी यासह चार महत्वपूर्ण मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी माजी आमदार दिलीप बंसोड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना शुक्रवारी (दि.२४) निवेदन दिले. याप्रसंगी क्षेत्रातील अन्य काही जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. निवेदनात, शिक्षण समितीच्या ठरावाप्रमाणे क्रीडांगण विकास अनुदानांतर्गत जिल्हा परिषद शिक्षण सभापतींनी क्रीडांगणाला आवारभिंत तयार करणे या लेखाशिर्षांतर्गत यादी क्रीडाधिकाऱ्यांना पाठविली. मात्र या यादीत ज्या शाळांना आवारभिंत नाही व ज्यांना आवश्यकता आहे अशा शाळांना राजकीय भावनेतून सोडून दिले. तसेच सभापती स्वत: सचिव पदावर कार्यरत असलेल्या चिचगाव-पुरगाव येथील मनोहरभाई पटेल हायस्कूलला आवारभिंतीसाठी प्रस्ताव पाठविला. त्यामुळे अशी कामे त्वरीत रद्द करून आवश्यक असणाऱ्या शाळांना लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. दुसऱ्या विषयांत, जिल्हा परिषदेची निवडणूक होवून दोन वर्षे होत असतानाही डीपीडीसी या कमिटीत जिल्हा परिषद सदस्यांना घेण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नियोजन जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता करणे शक्य नसून याचा परिणाम विकास कामांवर पडणार आहे. याच प्रकाराला घेऊन भंडारा येथील जिल्हा परिषद सदस्य न्यायालयात गेले होते व त्यांना कमिटीत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जि.प.सदस्यांनी त्वरीत नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तिसऱ्या विषयांत, जिल्ह्यात अल्पसंख्यक मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून लोकसंख्येची यादी सादर न झाल्यामुळे अल्पसंख्यक विकासाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजूर केले नाही. परिणामी अल्पसंख्यांकावर खर्च होणारा निधी खर्च होवू शकला नाही. करिता प्रस्ताव त्वरीत मंजूर करून मुंडीकोटा येथील प्रस्तावही मंजूर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तर चौथ्या विषयात, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौन खनिज निघत असून मोठ्या प्रमाणात रेती घाट आहेत. ज्या भागात रेती घाट आहेत त्या भागातील रस्ते खूपच खराब झाले आहेत. शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत कमिटी गठीत करण्यात आली आहे. मात्र कमिटीची एकही सभा झालेली नाही. त्यामुळे गौन खनिज विकासाची कामे दोन वर्षांपासून ठप्प आहेत. कवलेवाडा क्षेत्रात पाच रेती घाट असून तेथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गौन खनीच विकास निधीतून रस्त्यांची त्वरीत दुरूस्ती करण्याची मागणीही डोंगरे यांनी केली. माजी आमदार दिलीप बंसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत या विषयांना घेऊन जिल्हाधिकारी काळे यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, ललिता चौरागडे, रजनी गौतम, रिना बिसेन उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)
गौण खनीज विकास निधीतील कामे मंजूर करा!
By admin | Updated: March 27, 2017 00:58 IST