गोंदिया : गावागावांत रामराज्य प्रस्थापित व्हावे, गाव हा देशाच्या नकाशा व्हावा व देशातील प्रत्येक खेडी शहरापेक्षाही सुंदर असावी, अशी संकल्पना राष्टÑसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडली. शेतकर्यांच्या उन्नतीपासून देशभक्तीपर्यंतचे धडे देण्याचे काम राष्टÑसंतांनी ग्रामगीतेतून केले आहे. समृद्ध भारत, आदर्श भारत घडविण्याची दिशा देणारी गीता म्हणजे राष्टÑसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता असल्याचे उद्गार हभप एम.ए. ठाकूर यांनी काढले. तालुक्याच्या नंगपुरा मुर्री येथे आयोजित जिल्हास्तरीय ग्रामजयंती महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी येथील डॉ. रघुनाथ वाडेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बळवंत येरपुडे, भांडारकर, भोजलाल बिसेन, तालुका सेवाधिकारी भोजराज बघेले, प्रचार प्रमुख प्रेमलाल घरत उपस्थित होते. यावेळी ‘प्यारा हिंदुस्तान है, गोपालो की शान है, वीरो का मैदान, इसमे भक्तों के भगवान है, देश सांभाळा, धर्म ही पाळा संस्कृति सांगे, एकता का हो, एकता का?, दिलबर के लिये, दिलदार है हम, दुष्मन के लिए तलवार है हम, मानव के लिए परिवार है हम, दानव के लिए अंगार है हम, मत होना बैमान देश को, मत होना बैमान’ अशी भजने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. राष्टÑीय एकात्मतेची भावना रुजावी यासाठी भारत शानदार हो मेरा हे भजन सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाला सेजगाव, भानपूर, चौकीटोला, पाथरी, मुंडीपार या गावातील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुर्री येथे गुरुदेव सेवकांनी स्वच्छता मोहीम पहाटे राबवून ध्यानपाठाचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाचे संचालन अशोक हरिणखेडे, प्रास्ताविक डी.ए. भांडारकर तर आभार श्रीराम शरणागत यांनी मानले. राष्टÑवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवाधिकारी दुधराम भांडारकर, किशोर हरिणखेडे, श्रीराम शरणागत, जयदेव पारधी, ओमप्रकाश रहांगडाले, कमलेश सोनवाने, शैलजा सोनवाने, सरपंच तीर्थराज रहांगडाले, मदनलाल दाते, जीवनलाल येडे, भागवत साठवणे, चंद्रभान राऊत, नामदेव इळपाचे, गावकरी व श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
समृद्ध भारत घडविण्याची दिशा देते ग्रामगीता
By admin | Updated: May 18, 2014 23:43 IST