गाडगेबाबा स्वच्छता अभियान : तालुकास्तरीय रकमेत वाढ केल्याने उत्साहगोंदिया : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कार रकमेत शासनाने भरघोस वाढ केली. पंचायत समितीस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना आता एक लाखाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसहभाग वाढवून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण होत आहे.राज्यात सन २०००-२००१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. स्वच्छता व ग्रामविकासाशी निगडीत क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना या अभियानाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पुरस्कृत केले जाते. मात्र ग्रामीण भागात अशुध्द पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी अभियानाचा उद्देश फारसा सफल न झाल्याने शासनाने पुरस्काराच्या रकमेत वाढ करून लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ हजार रुपयांचे प्रथम, १५ हजार रुपयांचे द्वितीय आणि १० हजार रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येत होते. आता या रकमेत भरघोष वाढ करण्यात आली. शासनाच्या निर्णयान्वये आता तालुकास्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना एक लाख रुपयांचे प्रथम, ५० हजार रुपयांचे द्वितीय आणि २५ हजार रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला पाच लाख रुपये प्रथम, तीन लाख रुपयांचे द्वितीय, दोन लाख रुपयांचे तृतीय, विभागस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे प्रथम, आठ लाख रुपयांचे द्वितीय, सहा लाख रुपयांचे तृतीय पुरस्कार तर राज्यस्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपयांचे प्रथम, २० लाख रुपयांचे द्वितीय आणि १५ लाख रुपयांचे तृतीय पुरस्कार प्रदान केले जातात. (जिल्हा प्रतिनिधी)आरोग्याचे गमक स्वच्छतेतस्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी निगडीत बाब आहे. आपले गाव स्वच्छ असेल तर आपलेच आरोग्य अबाधीत राखले जाईल. शिवाय स्वच्छतेसाठी कार्य केल्यामुळे आपल्या ग्रामपंचायतींना भरघोस पुरस्कार मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
एक लाखाच्या पुरस्कारावर ग्रामपंचायतींचा डोळा
By admin | Updated: November 13, 2016 01:14 IST