नरेश रहिले गोंदियाराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्यलढ्याची ज्योत पेटवून आपली भजने व खंजिरीच्या तालावर त्या काळी देशभक्ती जागविली. त्यासाठी त्यांना अनेक हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या. इतकेच नव्हे तर तुरूंगातही जावे लागले. परंतु या राष्ट्रपुरूषाला शासनकर्ते विसरले. ज्यांनी समाज घडविला, देश जागविला, अश्या महान संताला राष्ट्रपुरूषांच्या यादीत समाविष्ट केले नाही. ही मागणी सतत होत असूनही शासन याकडे लक्ष देत नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासून विदर्भ बंद पाडू असा इशारा अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक बबनराव वानखेडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून दिला आहे. राष्ट्रीयतेची भावना जागृत ठेवणाऱ्या महापुरूषांनी त्यागाची भावना ठेवून कार्य केले. क्रांती ज्योतीची मशाल चिमूर, यावली आष्टी या ठिकाणी विशाल रूप धारण करण्यात महाराजांची भूमिका महत्वाची होती. नागपूर, रायपूर येथील जेलमध्ये त्यांना इंग्रजांनी डांबले. त्यांच्या प्रेरणेने लोकांनी आंदोलने केली. हे सांगताना राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यात असे लिहीले ‘अंग्रेज राजा के बखत, अफसर कही थे चढ गये, गुरूदेव की असीम कृपासे, सबही निचे पड गयें, उस सन बयालीस सालमे मुझे जेलही सहना पडा, क्रांती हुयेथी बडी जोर की पर आवाज था मुझसेही बडा’ क्रांतीचा आवाज मोठा करण्यात महाराजांची भूमिका अग्रणी होती. परंतु शासन आज त्या राष्ट्रसंताचे नाव राष्ट्रपुरूषांच्या यादीत टाकण्यात कुचराई करीत आहे. महाराजांचे नाव राष्ट्र पुरूषांच्या यादीत येण्यासाठी १५ वर्षापासून गुरूदेव सेवा मंडळाचा लढा सुरू आहे. त्या संदर्भात पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही, अशी खंत वानखेडे यांनी व्यक्त केली.शासनाला या संदर्भात पत्र पाठविली. शासकीय कार्यालयात २८ थोरपुरूषांची छायाचित्रे असल्याने या थोर पुरूषांची संख्या लक्षात घेता आणखी वाढ करता येणार नाही असे बेजबाबदारीपणाचे उत्तर सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी रा.सु.वडनेकर यांनी दिले आहे. त्यामुळे शासनाला वठणीवर आणण्यासाठी गुरूदेव सेवा मंडळाला आता आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे. त्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अिधवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच संपुर्ण विदर्भ बंद पाडू, याची औपचारीक घोषणा राष्ट्रसंताच्या पुण्यतिथीला गुरूकुंज येथून करण्यात येईल. आंदोलन शांततेच्या रूपाने करण्यात येईल. एसटी आपली आहे कुणी फोडणार नाही. कुणालाही हाणी न पोहचविता, तोडफोड न करता टाळ, खंजेरी, ढोलक घेऊन प्रत्येक गावातील गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य आपल्या गावानजीक असलेल्या रस्त्यावर भजन करतील. यामुळे रस्ता रोको होईल. मागणी पुर्ण होई पर्यंत रस्त्यावरच भजन करण्याचा माणस गुरूदेव सेवा मंडळाने घेतलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या राष्ट्रसंताचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाका अशी छोटीशी मागणी असताना शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गुरूदेव सेवकांना आता आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. असे बबनराव वानखेडे म्हणाले.
अधिवेशनात सरकारला घेरणार
By admin | Updated: August 30, 2015 01:31 IST