गाेंदिया : शेतकऱ्यांच्या धानाला भाव देण्यात यावा यासाठी शासनाने हमीभाव जाहीर केला सोबतच खरिपाच्या धानाला बोनसही जाहीर केला. त्यामुळे बोनसच्या लालसेपायी सहकारी संस्थेत धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला सहकारी धान गिरणीतच कसे गंडविले जाते याचा एक प्रकार पुढे आला आहे. आपल्याला न्याय मिळावे यासाठी त्या शेतकऱ्याने जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय गाठले आहे.
खरीप पिकाचे ५० क्विंटल ६० किलो धान भजेपार येथील शेतकरी पुरुषोत्तम श्रीराम बहेकार यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी सहकारी भात गिरणी सालेकसा येथे धानाची विक्री केली. त्या विक्री केलेल्या धानाची पावती त्यांना देण्यात आली नाही. तुम्हाला पावती देण्याची काही गरज नाही तुमची नोंदणी आम्ही करतो तुमच्या बॅंक खात्यावर पैसे येतील घरी जा असे सांगण्यात आले. त्यावर ते घरी आले. यासंदर्भात बहेकार यांनी वारंवार संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आज करू, उद्या करू असे टाळाटाळ करून ३१ मार्चपर्यंत चालढकल केली. परंतु २१ जानेवारीला खरेदी करण्यात आलेल्या धानाची नोंदणी ३१ मार्च होऊनही करण्यात आले नाही. तीन महिने होऊनही विक्री केलेल्या धानाचे पैसे न मिळाल्याने पुरुषोत्तम बहेकार यांची आर्थिक व मानसिक स्थिती खालावली आहे. मेहनत करूनही त्यांच्या हक्काचे पैसे न देणाऱ्या संस्थेवर कुणाचेही वचक नाही का? असा सवाल शेतकरी करीत आहे. पैसे न मिळाल्यामुळे मुलाचे शिक्षण करण्यासाठी शाळेत प्रवेश होऊ शकला नाही. नातेवाइकांकडून घेतलेल्या उसनवारीच्या पैशाचे त्यांना देणे करायचे आहे. परंतु सालेकसाच्या सहकारी भात गिरणीत होत असलेल्या घोळामुळे या शेतकऱ्याचे धान खरेदी झाले, पण त्यांच्या नावावर चढविण्यातच आले नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी बहेकार यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व तहसीलदार सालेकसा यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे.