श्रीलंकेतून भारतात : देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थितीगोंदिया : भारतीय बौद्ध महासभा व कल्याण मेत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मदीक्षा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त श्रीलंका सरकारद्वारे प्राप्त भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातू कलशाचे दर्शन करण्याची संधी गोंदियावासीयांना मिळणार आहे. हे पवित्र अस्थिकलश १६ आॅक्टोबर २०१५ रोजी गोंदियात आणण्यात येईल, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार, भगवान बुद्धांचे पवित्र अस्थिधातू कलश १४ आॅक्टोबर २०१५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट नागपूर येथे आणण्यात येईल. त्यानंतर इंदोरा येथील बेझनबाग मैदान नागपूर येथे दर्शनासाठी ठेवण्यात येईल. यानंतर १५ आॅक्टोबर रोजी भंडारा व १६ आॅक्टोबरला सकाळी गोंदियात आणण्यात येणार आहे. गोंदियातील भीमनगर येथील मैदानात लोकांच्या दर्शनासाठी सदर अस्थिधातू कलश ठेवण्यात येणार आहे. जिथे जिथे बुद्धांचे अस्थिधातू कलश नेण्यात येईल, तिथे तिथे कल्याण मेत्ता द्वारे भगवान बुद्धांच्या जीवनावर तयार केलेले चित्रपटाचे प्रीमिअर शो नि:शुल्क दाखविण्यात येणार आहे. १७ आॅक्टोबरला बालाघाट व १८ आॅक्टोबर रोजी छत्तीसगडच्या रायपूर येथे तथागतांचे अस्थिकलश नेण्यात येणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले आहे. सदर अस्थिकलशासह श्रीलंका येथील पोलीस अधिकारी, समता सैनिक दल, भिक्खू संघ व अनेक पदाधिकाऱ्यांचा ताफा उपस्थित राहणार आहे. १६ आॅक्टोबर रोजी तथागताच्या अस्थिधातू कलशाच्या दर्शनासाठी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी पूर्वतयारी करावी, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)पूर्वतयारीसाठी ३० आॅगस्टला गोंदियात सभातथागत भगवान गौतम बुद्धांचे अस्थिधातू कलश श्रीलंका देशातून भारतात आणण्यात येत आहे. तर गोंदियात १६ आॅक्टोबर रोजी आणण्यात येईल. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील बौद्ध बांधव व तथागतांच्या अनुयायांसाठी ३० आॅगस्ट २०१५ रोजी दुपारी शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बुद्धांचा अस्थिकलश येणार गोंदियात
By admin | Updated: August 29, 2015 01:55 IST