तयारी गणेशोत्सवाची : मूर्त्यांसाठी भिलाई-रायपूरला जाण्याची मेहनत वाचणारकपिल केकत गोंदियामूर्त्या व देखाव्यांसाठी छत्तीसगड, तर गणपती व दुर्गा उत्सवासाठी गोंदियाची दूरवर ख्याती आहे. गोंदियात या उत्सवासाठी मोठ्या संख्येत मूर्त्या छत्तीसगड राज्यातूनच आणल्या जातात. त्यामुळेच गोंदिया व छत्तीसगड राज्याची नाळ जुळलेली आहे. परंतू आता छत्तीसगडच्या मूर्तिकारांनीच गोंदिया गाठून गोंदियाच्या चितारओळीत ठाण मांडले आहे. गोंदियाची ख्याती आता छत्तीसगडच्या मूर्तिकारांना खेचून आणत असल्याचे यातून सिद्ध झाले.गोंदियाच्या गणपती व दुर्गा उत्सवाची ख्याती लगतच्या परिसरातच काय पण लगतच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यापर्यंत पोहोचली आहे. यामुळेच या दोन्ही उत्सवाची भव्यता व चमकधमक बघण्यासाठी येथून नागरिकांचे जत्थे गोंदियात येत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. यामागची विशेषता म्हणजे गोंदियावासीयांची श्रद्धा तर आहेच मात्र आकर्षक मूर्त्या व देखावे त्यात अधिकची भर घालणारे ठरतात. छत्तीसगड राज्यातील दुर्ग, राजनांदगाव, भिलाई, रायपूर या भागात तयार होणाऱ्या मूर्त्यांनी गोंदियावासीयांना भूरळ घातली आहे. यामुळेच येथील सार्वजनिक उत्सव मंडळ मोठ्या संख्येत छत्तीसगड राज्यातून मूर्त्या मागवितात. मूर्त्या काय तर येथील देखावे, झाक्या व रोषणाई सुद्धा प्रसिद्ध असल्याचे छत्तीसगडची गोंदियात चांगलीच डिमांड असून पावले आपोआप छत्तीसगडकडे वळतात. याचेच फलीत आहे की, गोंदियाच्या उत्सवाची ख्याती वाढतच चालली आहे. मात्र याचा परिणाम असा होत आहे की, आता गोंदियाच्या उत्सवाची ख्याती ऐकून छत्तीसगडमधील मूर्तीकार गोंदियाची वाट धरू लागले आहेत. याचे मूर्त उदाहरण येथील सिव्हिल लाईन माता मंदिर चौकात बघावयास मिळाले. शहरात मूर्त्यांसाठी सध्या सिव्हिल लाईन परिसर प्रसिद्ध होत आहे. लगतच्या परिसरातील मूर्तीकार येथेच आपले बस्तान मांडत असल्याने हनुमान चौक ते माता मंदिर चौक हा मार्ग सध्या नागपूरच्या चितारओळी प्रमाणेच गजबजू लागला आहे. त्यात माता मंदिर चौकात छत्तीसगड राज्यातील भिलाई पॉवर हाऊस येथील मूर्तिकारांनी आपल्या परिवारासह येथे बस्तान मांडले आहे. पिढ्यानपिढ्या सुरू असलेले मूर्ती बनविण्याचे काम आजही या परिवाराकडून तेवढ्याच मेहनतीने केले जात आहे. गोंदियात मोठ्या प्रमाणात छत्तीसगड मधून मूर्त्या येत असल्याचे व येथील ख्याती ऐकून आपण गोंदियात आलो असल्याचे ते सांगतात. गोंदियात नातेवाईक असून त्यांच्याकडूनही माहिती मिळाल्याने गोंदिया गाठले असून गोंदियावासीयांकडून चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. यामुळेच त्यांच्याकडे सार्वजनिक मंडळासह मोठ्या संख्येत खासगी लहान मूर्त्यांचे बुकिंग आहे. गोंदियावासीयांना छत्तीसगड मधील मूर्त्यांचे आकर्षण आहे. त्यात मोठ्या श्रद्धा व सुसंपन्नतेत गोंदियाचा उत्सव साजरा होत असल्याची ख्यातीच आम्हाला येथे ओढून आणल्याचे ते सांगतात. विशेष म्हणजे छत्तीसगड येथून मूर्तिकला शिकलेले मूर्तिकारही गोंदियात येत असल्याचे दिसून येत आहे.
छत्तीसगडच्या मूर्तिकारांना गोंदियाची ओढ
By admin | Updated: September 7, 2015 01:46 IST