- नरेश रहिले गोंदिया : आमगाव तालुक्याच्या पोकेटोला (मानेकसा) येथील तरुण सकाळी धावण्यासाठी गेले असताना घामामुळे ते वाघ नदीच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले होते. परंतू, अंघोळ करताना ते डोहात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना २५ मे रोजी सकाळी ५:३० वाजता वाघनदीच्या पोकेटोला येथील घाटात घडली. कृष्णकुमार हेतराम पारधी (१९) व शुभम भीमराव कांबळे (२०) दोन्ही रा. पोकेटोला (मानेकसा) अशी मृतांची नावे आहेत. दररोज ते पोलीस भरतीच्या मैदानी तयारीसाठी सकाळीच फिरायला जात होते. २५ मे रोजी सकाळी ते फिरायला गेले असताना काही वेळ धावल्यावर ते घामाघुम झाले. यात घामापासून बचावासाठी त्यांनी नदीत आंघोळ करण्याचा निर्णय घेतला.
परिणामी आंघोळ करताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक शोध बचाव पथकामार्फत त्यांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.