गोंदिया : येथील मोक्षधाम सौंदर्यीकरणाच्या कामाला आता नवे वळण आले आहे. या कामात निवीदाधारक कंत्राटदारास सौंदर्यीकरणाचे काम सोडून मोक्षधामच्या मागील बाजूला असलेल्या नाल्याचे काम करण्यास सांगीतले जात आहे. तर दुसऱ्याच एका कंत्राटदारावर मेहरबानी करून त्याला मोक्षधामातील काम करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. एकंदर मोक्षधाम सौंदर्यीकरणाच्या कामात गोलमाल होत आहे. यात आता दुसऱ्याच कंत्राटदारावर होत असलेली मेहरबानी हा मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. दलितेत्तर योजनेतून येथील मोक्षधामात दोन नव्या शेडचे बांधकाम, पेवींग ब्लॉक लावणे, क्वार्टरची दुरूस्ती यासह सौंदर्यीकरणाचे काम करावयाचे आहे. सुमारे ५४ लाख रूपयांच्या निधीतून हे काम करावयाचे असून यासाठी नगर परिषदेकडे पैसाही उपलब्ध आहे. मोक्षधाम सौंदर्यीकरणाचे कंत्राट जयेश रामादे या कंत्राटारास देण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे ३२ लाख रूपयांचे काम करण्यात आले आहे. त्यानंतर मात्र नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून पुढील कामाबाबत निर्देश दिले जात नसल्याने मागील वर्षभरापासून हे काम बंद पडून आहे. या प्रकरणाला घेऊन ‘लोकमत’ने ३० नोव्हेंबर रोजी बातमी प्रकाशित केली व संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकला. त्यानंतर बांधकाम विभागाकडून अर्धवट पडून असलेले काम सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या. त्यात १२ जानेवारी रोजीच्या आमसभेत नगरसेवक राजकुमार कुथे यांनी लोकमतच्या बातमीच्या आधारे हा प्रकार उचलून धरला. तसेच त्यांनी मोक्षधामच्या मागील बाजूला असलेल्या नाल्याचे पक्के बांधकाम करण्याचा विषय सभेत मांडला. त्यांच्या या मागणीला मंजूरी देत नाल्याचे काम करण्यास सभेत मंजूरी देण्यात आली. येथेच मात्र नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने गोलमाल केला. बांधकाम विभागाकडून येथे मोक्षधामच्या मागील बाजूला असलेल्या नाल्याचे काम करण्यासाठी जयेश रामादे यांना सांगीतले जात आहे. तर मोक्षधामच्या आतील काम करण्यास मयुर कंस्ट्रक्शन यांना सांगीतले जात असल्याची माहिती आहे. येथे मोक्षधामचे कंत्राट रामादे यांना असताना त्यांना मोक्षधामचे काम सोडून नाल्याचे काम सांगीतले जात आहे. तर मयुर कंस्ट्रक्शन यांच्याकडे बाजपेई चौक परिसरातील रस्ता दुभाजकाचे काम होते. मात्र तेथील नागरिकांनी ते काम बंद पाडले व त्या कामाचे पैसे आता कोठेतरी खर्च करावयाचे असल्याने त्यांना मोक्षधामच्या कामात वापरण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. येथे मात्र अधिकृत कंत्राटदाराला सोडून भलत्यालाच मोक्षधामचे काम करण्यास सांगणे या प्रकार आश्चर्यजनक आहे. तर मयुर कंस्ट्रक्शनकडून नाल्याचे काम करविणे अपेक्षीत आहे. येथे त्यांच्यावर मेहरबानी केली जात असल्याने हा विषय सध्या पालिकेत चर्चेचा विषय ठरला असून यात कोठेतरी पाणी मुरत असल्याचेही बोलले जात आहे. शिवाय मागील वर्षभरापासून काम बंद पडून असताना बांधकाम विभागाला काळजी नव्हती. आता मात्र रामादे यांना नाल्याचे काम करण्यासाठी वारंवार बोलले जात असल्याचीही माहिती आहे. आता या प्रकरणात काय होते हे बघायचे आहे. (शहर प्रतिनिधी)
मोक्षधाम सौंदर्यीकरणात गोलमाल
By admin | Updated: March 19, 2016 01:50 IST