बाराभाटी : शेतकऱ्यांना अद्याप रब्बी धान विक्रीचे चुकारे, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान तसेच बोनस मिळाले नसून ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस अनुसूचित जातीचे तालुकाध्यक्ष अनिल दहिवले यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी रब्बीतील धान आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना विकले असून त्यांना अद्याप चुकारे मिळालेले नाहीत. शिवाय दरवर्षी प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणार असल्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र ते अनुदानही अद्याप मिळाले नाही. शिवाय धानावरील बोनसपासूनही शेतकरी वंचित आहेत. कोरोनामुळे सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाले आहेत. मजुरांच्या हाताला काम नाही. अशात शेतकऱ्यांना रब्बीतील धानाचे चुकारे, प्रोत्साहन अनुदान व बोनस त्वरित देण्यात यावा अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा तालुका काँग्रेस अनुसूचित जातीचे तालुकाध्यक्ष दहिवले, उपाध्यक्ष प्रीतम झेमराज रामटेके, सरचिटणीस धम्मदीप हिरामण मेश्राम यांनी दिला आहे.