बोंडगावदेवी : शेतकरी वर्ग आशेवर जगत आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन राशी देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. शेतकरी त्या राशीची चातकाप्रमाणे वाट बघत आहे. कर्जाची परतफेड करताना ती राशी उपयोगात येईल अशी आस्था शेतकऱ्यांना होती. प्रोत्साहन राशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. कर्ज परतफेड करण्याचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढविण्यात यावा अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद लांजेवार यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.
वारंवार नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन राशी विनाविलंब जमा करावी या मागणीच निवेदन प्रमोद लांजेवार यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवून कर्ज परतफेड करण्याची मुदत ३० जूनपर्यंत करावी अशी मागणी केली आहे. प्रोत्साहन राशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे चालु वर्षाच्या पीक कर्जाची परतफेड करताना शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करताना मोठी कसरत करावी लागत आहे. धानाला बोनस जाहीर केल्याने धानाची विक्रमी खरेदी झाली. धानाची उचलच झाली नाही. बऱ्याच शेतकऱ्यांच्या धानाची विक्री झाली नाही. वेळेच्या आत धानाची रक्कम खात्यात जमा झाली नाही. कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सराकरकडून प्रोत्साहन राशी मिळण्यास विलंब होत असल्याने ऊसाप्रमाणे धानाच्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यासाठी पटोले यांनी प्रयत्न करावे अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद लांजेवार यांनी केली आहे.