केशोरी : केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजनाची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र भोजन शिजविणाऱ्या महिलांना आता शाळा मुख्याध्यापकांकडे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याशिवाय ती महिला अन्न शिजविण्यासाठी पात्र समजल्या जाणार नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे.विद्यार्थी पटसंख्येच्या प्रमाणात मध्यान्ह भोजन शिजवून देणाऱ्या महिलांची संख्या निश्चित केली जाते. शाळा मुख्याध्यापकांनी शिफारस केलेल्या महिलांची नियुक्ती करुन त्यांना प्रतिमहा एक हजार रुपये मानधन शासन देत आहे. अन्न शिजवून देणाऱ्या महिलांचे आरोग्य चांगले असावे, त्यांना चर्म रोगांसारखे संसर्गजन्य आजार असू नये, त्या रोगाचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होणार नाही यासाठी त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक, बंधनकारक केले आहे. त्याशिवाय ती महिला अन्न शिजविण्यासाठी पात्र नाही, असे समजण्यात येईल असे शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. जर एखादी महिला सदर प्रमाणपत्र आणण्यास टाळाटाळ करीत असेल तर तिला ताबडतोब कामावरुन काढून टाकण्याचे अधिकार शाळा मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. आता पोषण आहार योजनेतील अन्न शिजविणाऱ्या महिलांना आरोग्य विभागाकडून आरोग्य चांगले असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय अन्न शिजविण्याच्या कामावर राहता येणार नाही. त्यामुळे बचत गटाच्या महिलांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागणार आहे. (वार्ताहर )
आहार शिजविण्यापूर्वी आरोग्याचे प्रमाणपत्र द्या
By admin | Updated: September 8, 2015 03:55 IST