बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील ६७ सेवा सहकारी मर्यादित संस्थेंतर्गत येणाऱ्या सुमारे ३५०० खातेदार शेतकऱ्यांना सहकारी बँक शाखा तिरोडा २०२०-२१ या वर्षात बिनव्याजी कर्ज वाटप करण्यात आले. ते कर्ज परतफेड करण्याची मुदत ३१ मार्च आहे, ती ३० जूनपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामात धानाची लागवड, बियाणे, खते यासाठी सेवा सहकारी संस्थेमार्फत सहकारी बँकेतून बिनव्याजी कर्जाचे वाटप करण्यात येते. तालुक्यात ६७ सेवा सहकारी संस्था असून, जवळपास ३५०० शेतकरी खातेदार आहेत. खरीप हंगामातील धान पीक विक्री करून ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड सेवा सहकारी संस्थेद्वारे बँकेला करावी? लागते. धानाला खोडकिडा, मावा तुडतुडा व इतर रोग लागल्याने खरीप हंगामात धानाचा उतारा कमी आला. त्यातच शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रात धानाची विक्री केली. अशात अनेक शेतकरी खातेदारांना धानाचे चुकारे मिळाले नाहीत, त्यामुळे पीक कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी परतफेड करण्याची सवलत देऊन ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.