केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी हे गाव लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मोठे गाव आहे. या गावावरून कुरखेडा-अर्जुनी मोरगाव-नवेगावबांध आणि वडसा जवळपास २० ते २५ किलोमीटर अंतरावर आहेत. या परिसरातील नागरिक या गावावरून ये-जा करतात. या गावात एक मुख्य रस्ता असल्यामुळे सर्व वाहनांची वर्दळ या गावातील मुख्य रस्त्याने होत असते. दळणवळणाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बायपास रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसने आ. मनोहर चंद्रिकापुरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ब्रह्मपुरी आगाराने ब्रह्मपुरी-वडसा-वडेगाव-केशोरी या मार्गांनी बससेवा सुरू केली आहे. तसेच नागपूरवरूनसुद्धा ट्रॅव्हल्स अर्जुनी मोरगाव व केशोरी याठिकाणी येत असते. ही सर्व वाहने गावाच्या मुख्य रस्त्याने जात असतात. त्यामुळे खूपच त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीच हा मुख्य रस्ता अरुंद असल्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. दहा वर्षांपूर्वी या परिसरातील आणि केशोरी येथील नागरिकांनी केशोरीला बायपास रस्त्याची मागणी शासनाकडे केली होती. प्रकाश पाटील गहाणे बांधकाम सभापती असताना त्यांनी या कामाला गती आणली होती. ज्या ठिकाणातील बायपास रोड जात आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून त्याविषयी त्यांना मार्गदर्शन केले. जवळपास दोन हेक्टर नव्वद डिसमिलएवढी जमीन शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जात आहे. शेतकरी जागा देण्यासाठी तयार आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यासाठी शासनाने २७ लाख रुपये मंजूर केले आहेत. परंतु हे पैसे पुन्हा शासनाकडे परत गेले आहेत. वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी योगेश नाकाडे यांनी केली आहे.
............
शेतकऱ्यांशी केली चर्चा
आ. चंद्रिकापुरे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसाठी चर्चा करण्यासाठी केशोरी येथे पाठविले.
यावेळी माजी बांधकाम सभापती प्रकाश पाटील-गहाणे, सरपंच नंदकुमार पाटील-गहाणे, माजी उपसरपंच हिरालाल शेंडे, तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष योगेश नाकाडे, अनिल लाडे, विजय गहाणे, अरुण मस्के व ज्या शेतकऱ्यांची जमीन या बायपास रोडमध्ये जात आहे ते सर्व शेतकरी बैठकीला उपस्थित होते. त्यांनी बायपास रोडबाबत त्यांच्याशी चर्चा केली.