राजकुमार बडोले : सडक-अर्जुनीत १८ हजार ३८४ लाभार्थ्यांना लाभसडक-अर्जुनी : शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. या शिबिरातून शासन आपल्या दारी आले आहे. गरजू व पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी महासमाधान शिबिरे ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सडक-अर्जुनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बुधवार (दि.२२) महाराजस्व अभियानांतर्गत महावितरण महासमाधान आणि दिव्यांग स्वावलंबन अभियान कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, पं.स. सभापती कविता रंगारी, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, सडक-अर्जुनीचे नगराध्यक्ष रिता लांजेवार, पं.स. उपसभापती विलास शिवणकर, जि.प. सदस्य माधुरी पाथोडे, शीला चव्हाण, पं.स. सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, मडावी, भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशीवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, डुग्गीपारचे ठाणेदार केशव वाभळे उपस्थित होते.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून ५१ योजनांचा लाभ गावपातळीवरच्या लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. या शिबिरामुळे गावातील कोणत्या कुटुंबांना किती योजनांचा लाभ दिला तसेच किती योजनांच्या लाभाची आवश्यकता आहे याची परिपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्याची आवश्यकता आहे. यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे शिबिराच्या माध्यमातून १८ हजार ३८४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. गावातील कुटुंबांना जास्तीत जास्त गॅस कनेक्शनचे वितरण वन विभागाने करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याचा समाजकल्याण मंत्री म्हणून अनेक योजना कार्यान्वित केल्याचे सांगून इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील डव्वा, कालीमाटी येथील बौध्दविहार आणि गोंदिया येथील भीमघाटाच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात ओबीसी मंत्रालयाचे कामकाज सुरु होईल. नवेगावबांध येथे आठ कोटी रूपये खर्चून रिसॉर्टचे बांधकाम सुरु आहे. प्रतापगडच्या विकासाला गती मिळाली आहे. मामा तलावांची दुरूस्ती, रस्त्यांची दुरूस्ती, मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना गावांसाठी कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महासमाधान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवोदय विद्यालय नवेगावबांध व आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांकडून प्रशंसा मिळविली. कार्यक्रमाला सडक-अर्जुनी तालुक्याच्या अनेक गावांतील नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी मांडले. संचालन अनिल मेश्राम यांनी केले. आभार प्रभार गटविकास अधिकारी झामिसंग टेंभरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)लाभार्थ्यांना दिला विविध लाभदिव्यांग स्वावलंबन अभियानांतर्गत लाभार्थ्यांना साहित्य वाटप, राज्य अपंग वित्त व विकास महामंडळांतर्गत लाभार्थ्यांना थेट कर्ज योजनेच्या २० हजार रूपयाचे धनादेश, वैयक्तिक थेट कर्ज योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात आले. महात्मा फुले महामंडळांतर्गत लाभार्थ्यांना १० हजार रूपयांचे धनादेश, इतर मागासवर्ग महामंडळांतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रूपयांचे धनादेश, वसंतराव नाईक महामंडळांतर्गत २५ हजार रूपयांचे धनादेश, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नवीन शिधापत्रिका दुय्यम प्रत, जात प्रमाणपत्र, वर्ग-२ चे वर्ग-१ प्रकरण, वाटणीपत्र, वनहक्क पट्टे वाटप, भूमी अभिलेख मोजणी क प्रत वाटप, जमीन सुपिकता प्रमाणपत्र, ट्रॅक्टर अनुदान, नॅपसॅक हायटेक स्प्रेपंप, म्हैस खरेदी धनादेश वाटप, शेळी संच धनादेश वाटप, रमाई आवास योजनेंतर्गत सौर कंदील व ब्लँकेट वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पीव्हीसी पाईप वाटप, मुद्रा बँक लोन, पीओएस मशीन वाटप, सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत पासबुक वाटप, वनविभागामार्फत एलपीजी गॅसचे वितरण, महावितरणकडून घरगुती वीज कनेक्शन, कृषिपंप कनेक्शन, सौर ऊर्जा कृषिपंप आदी योजनेच्या १८ हजार ३८४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
महासमाधान शिबिर चळवळ व्हावी
By admin | Updated: February 24, 2017 01:55 IST