नायब तहसीलदारांना निवेदन : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह इतर मागण्यांचा समावेशअर्जुनी मोरगाव : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवार (दि.२२) शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी व सामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाववर मोर्चा काढण्यात आला. लक्ष्मी भात गिरणी येथून हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने विद्यमान शासनाच्या विरोधात नारे लावून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात येवून मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गावळ यांना देण्यात आले. यावेळी ठाणेदार नामदेव बंडगर उपस्थित होते.मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आ. दिलीप बन्सोड, प्रदेश सदस्य मनोहरराव चंद्रीकापुरे, किशोर तरोणे यांनी केले. शेतकरी व सामान्य माणसाच्या समस्यांची प्रचिती शासनास यावी व त्या समस्या शासन स्तरावर सोडविण्यात यावे यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, कृषी पंपाना पुरविल्या जाणारी विद्युत भारनियमन बंद करुन पूर्ण दाबाची वीज द्यावी, धानपिकाच्या उत्पादन खर्चाच्या अधिक ५० टक्के हमीभाव देण्यात यावा, स्वाभिमान आयोगाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्या, निराधारांच्या विविध योजना कुठालाही राजकीय भेद न करता गरजुंना लाभ देण्यात यावा, प्रधानमंत्री आवास योजनेत भालार्थ्यांची निवड करताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन गरजुंना लाभ देण्यात यावा, झाशीनगर उपसा सिंचन योजना त्वरित कार्यान्वित करुन समाविष्ट गावांना त्वरित कृषी सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात यावा, तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्माण व्हावा याकरिता निमगाव एमआयडीसीचा पूर्णत: विकास करुन उद्योग उभे करण्यात यावे, वीज कंपनीकडून मागील दोन वर्षाच्या काळात चारपटीने वाढविलेले बिल कमी करुन ग्राहकांची लूटमार थांबवावी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भीषण पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाईचे त्वरित निवारण करावे, घरगुती वापरातील गॅसचे वाढलेले दर कमी करावे, उज्ज्वला योजनांच्या लाभार्थ्यांना विनामूल्य लाभ देवून त्यांना सबसिडी देण्यात यावी, नवीन शिधापत्रिका धारकांना अन्न पुरवठा करण्यात यावा, तालुक्यातून जाणारे ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग व राज्य महामार्गाच्या बांधकामाची चौकशी करून महामार्गावर होणाऱ्या अपघाताची जबाबदारी ही बांधकाम विभागाकडे देण्यात यावी, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव व नवेगावबांध व प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्यात यावी, अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवून देण्यात यावी व थकीत शिष्यवृत्ती त्वरित मंजूर करुन देण्यात यावी, वनजमिनीचे रेंगाळत असलले नऊ हजार अतिक्रण धारकांचे पट्टे त्वरित देण्यात यावे, बंगाली लोकांना जातीचे प्रमाणपत्र व जमिनीचे तथा राहत्या घराचे पट्टे त्वरित देण्यात यावे, बंगाली लोकांना जातीचे प्रमाणपत्र व जमिनीचे तथा राहत्या घराचे पट्टे त्वरित देण्यात यावे, ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध व अर्जुनी मोगरावला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, लघु उद्योग कर्ज माफ करण्यात यावे, एमआरईजिएस योजनेची कुशल व अकुशल कामाकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात यावे. या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाचे निवेदन नायब तहसीलदार गावळ यांनी स्विकारले.प्रास्ताविक जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी मांडले. संचालन गोवर्धन ताराम यांनी केले. आभार पंचायत समिती सदस्य जे.के. काळसर्पे यांनी मानले. याप्रसंगी मोर्चामध्ये बंडू भेंडारकर, नामदेव डोंगरवार, रवी बडोले, हेमकृष्ण संग्रामे, गजानन कोवे, रतिराम राणे, मनोहर शहारे, लोकपाल गहाणे, शालीक हातझाडे, अजय पाऊलझगडे, पं.स. सदस्य सुधीर साधवानी, जि.प. सदस्य भाष्कर आत्राम, लिना डोंगरवार, माधुरी पिंपळकर, कुंदा नंदेश्वर व राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 00:37 IST