जनगणना २०११ : शहरी क्षेत्रात ५७.५२ तर ग्रामीण ४.२१ टक्के वाढगोंदिया : शहरातील चमक-धमक म्हणा किंवा रोजीरोटीची साधने, मात्र ग्रामीण जनता शहराकडे ओढली जात आहे. हेच कारण आहे की, ग्रामीण क्षेत्रात जेथे लोकसंख्या वाढ फक्त ४.२१ टक्के झाली, तिथेच शहरी क्षेत्रात ५७.५२ टक्के वाढ झाली आहे. ही नोंद जिल्ह्यात सन २००१ व सन २०११ या दशकाच्या जनगणनेत करण्यात आली आहे. धर्मनिहाय बघितल्यास ग्रामीण क्षेत्रात मुस्लीम, शिख, जैन, बौद्ध व अन्य धर्मियांत चांगलीच घट झाल्याचे दिसते. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ नोंदविण्यात आली आहे. यात १० लाख ९६ हजार ५७७ लोक ग्रामीण तर दोन लाख २५ हजार ९३० लोक शहरी क्षेत्रात असल्याचे नोंद आहे. सन २००१ मध्ये १२ लाख ७०७ लोकसंख्येतून ग्रामीण क्षेत्रात १० लाख ५२ हजार २७६ व शहरात एक लाख ४३ हजार ४३१ लोकसंख्येची नोंद आहे. येथे सन २००१ च्या तुलनेत सन २०११ मध्ये ग्रामीण क्षेत्रात ४.२१ टक्के वाढ बघण्यात आली आहे. यात हिंदू ४.८७ टक्के, ख्रिश्चन ५८.९४ टक्के, मुस्लीम ५.५९ टक्के, शिख १०.३८ टक्के, जैन १४.९० टक्के, बौद्ध २.९९ टक्के व अन्य धर्मियांत ६२.२५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे जनगणनेदरम्यान ग्रामीण क्षेत्रातील दोन हजार ७०९ पुरूषांनी व दोन ४८३ महिलांनी आपला धर्म सांगीतलेला नाही. मात्र शहरातील लोकसंख्येत ५७.५२ टक्के वाढ झाली आहे. सन २००१ मध्ये शहरातील लोकसंख्या एक लाख ४३ हजार ४३१ होती. सन २०११ पर्यंत ही वाढून दोन लाख २५ हजार ९३० वर पोहचली. यात धर्मनिहाय बघितल्यास हिंदू ६०.०६ टक्के, मुस्लीम ४६.४३ टक्के, शिख ५२.६४ टक्के, ख्रिश्चन २४.०३ टक्के, जैन १६.४६ टक्के व अन्य धर्मियांत ५५.९२ टक्के वाढ झाली आहे. शहरात ७५० पुरूष व ६३० महिलांनी आपला धर्म सांगीतला नाही. जिल्ह्यात लोकसंख्येत घट नोंद करण्यात आली आहे. मात्र काही विशेष धर्मांची लोकसंख्या वाढलेली असल्याचे दिसते. (शहर प्रतिनिधी)
पाऊले चालती शहराची वाट...
By admin | Updated: August 29, 2015 01:51 IST