पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महासमाधान शिबिराचा गोरेगावात समारोप गोरेगाव : महासमाधान शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि वस्तू स्वरु पात मदत करण्यात आली आहे. केवळ यावरच समाधान न मानता आता जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांक वाढीसाठी वनांवर आधारित व्यवसाय, मत्स्योत्पादन, दुग्धव्यवसाय आणि उद्योग वाढीच्या चालनेतून आता रोजगार निर्मितीवर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. गोरेगाव पंचायत समितीच्या प्रांगणात गुरूवारी (दि.२३) आयोजित महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित महावितरण महासमाधान व दिव्यांग स्वावलंबन अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार खोमेश रहांगडाले, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती दिलीप चौधरी, उपसभापती बबलू बिसेन, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, रोहिणी वरकडे, रजनी सोयाम, पं.स.सदस्य गजभिये, पुष्पराज जनबंधू,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, लक्ष्मण भगत प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना बडोले यांनी, दिव्यांग स्वावलंबन अभियानाची राज्यात सुरुवात गोंदिया येथूनच झाली आहे. या शिबिरात ४२६ दिव्यांग बांधवांना लाभ देण्यात आला आहे. जवळपास ५१ योजनांचा लाभ या तालुक्यातील १६८२७ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. अपंगांना तीन टक्के घरकुल व नोकरी देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यांच्यासाठी तीन टक्के ग्रामपंचायतचा निधी खर्च झाला पाहिजे. नक्षलग्रस्त भागासाठी निधी खर्च करताना सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवती नोकरीला लागावेत यासाठी एमपीएससी व युपीएससीचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. तसेच, कौशल्य विकासासाठी बार्टीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येईल. जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थस्थळांचा विकास करण्यात येईल. विविध लाभार्थी व पात्र शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत, कलपाथरी प्रकल्पात ज्यांच्या जमीनी गेल्या आहेत त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असेही बडोले म्हणाले. आमदार रहांगडाले यांनी, शासन विविध योजना राबविते. परंतू गरजू लोकांपर्यंत त्या पोहचत नाही. या शिबिराच्या माध्यमातून योजना पोहोचिवण्यास मदत होत आहे. प्रत्येक विभाग या निमित्ताने लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देत आहे. शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचिवण्याची जबाबदारी ग्रामसेवक व तलाठ्यांनी पार पाडावी. जिल्ह्यातील बेरोजगार, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न सुटले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी काळे यांनी, गरजू लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचिवण्यासाठी हे महासमाधान शिबीर उपयुक्त ठरले आहे. भविष्यात मोबाईलच्या माध्यमातून योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल. अशाच प्रकारचे काम भविष्यातही सुरु च राहील असे सांगीतले. पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी, जिल्ह्यात हे समाधान शिबीर यशस्वीपणे राबविल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय यंत्रणांना आणून सुसूत्रतेने लोकांच्या कल्याणाचे काम पालकमंत्री करीत आहेत. पोलीस विभाग आपल्या कर्तव्यावर दक्ष राहून जिल्ह्यात काम करीत आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निधी मंजूर करण्यात आला असून युवावर्ग नक्षलप्रवाहात न जाता विकास प्रक्रियेत यावा यासाठी रोजगार निर्मितीचे कार्यक्र म राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पटले यांनी, शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिबिराची मदत झाली आहे. अडचणीतील लोकांना न्याय देण्याचे काम प्रशासनाने करावे. अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविक तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी मांडले. आभार तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी मानले. यावेळी गोरेगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, अनेक गावातील नागरिक व विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
रोजगार निर्मितीवर भर देणार
By admin | Updated: February 25, 2017 00:23 IST