गोंदिया : भातखाचरच्या कामाचे बील काढून दिल्याचा मोबदला म्हणून पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या आमगावच्या कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई आमगाव येथील पंचायत समिती कार्यालयात गुरूवारी (दि.८) सायंकाळी करण्यात आली. सविस्तर असे की, तक्रारदारांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत भातखाचरचे काम जून महिन्यात करण्यात आले. या कामाचे २८ हजार रूपयांचे बील पंचायत समितीकडून तक्रारदाराच्या खात्यात जमा झाले. मात्र बील काढून दिल्याचा मोबदला व पुढील काम करून देण्यासाठी पंचायत समिती कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी भक्तप्रल्हाद निळकंठ राऊत याने तक्रारदारास सहा हजारांची मागणी केली. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता राऊत याने तडजोडीअंती पाच हजार रूपये स्वीकारले. यावेळी पथकाने त्यास रंगेहात पकडले. आमगाव ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)
पाच हजारांची लाच भोवली
By admin | Updated: September 9, 2016 01:55 IST