गोंदिया : गोंदियाच्या तहसील कार्यालयात रविवारी निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला बुट्टी मारणाऱ्या पाच जणांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी गोंदियाच्या तहसील कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन रविवारी सकाळी ११ ते २ वाजता दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या व शाळांच्या शिक्षकांना पाचारण केले होते. परंतु या प्रक्षिणाला गैरहजर राहणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांच्या विरूध्द गोंदिया शहर पोलिसात नायब तहसीलदार सोमनाथ बाबुराव माळी (३०) यांनी तक्रार केली. नगर परिषद गोंदिया येथील लिपीक काशिराम भांडारकर, शिवकुमार हुकरे, मनोहर म्युनिसिपल शाळेतील टिकाराम बळगे, नगर परिषद गर्ल्स हायस्कूल येथील एस.के. माने, नगर परिषदेतील लिपीक संजय उके हे पाचही जण गैरहजर होते.भांडारकर यांच्याकडे केंद्र क्र. १६० ची यादी, हुकरे यांच्याकडे केंद्र क्र.१९४ ची यादी, बळगे यांच्याकडे केंद्र क्र.१९८ ची यादी, माने यांच्याकडे केंद्र क्र. १९९ ची यादी व उके यांच्याकडे २२४ ची यादी देण्यात आली होती. परंतु पाचही जणांनी याकडे दुर्लक्ष केले. मतदरांना ओटरस्लीप देण्यासाठी सदर यादी त्यांच्याकडे देण्यात आली होती. तसेच कश्यापध्दतीने ओटर स्लीप वाटावे यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या त्या पाचही कर्मचाऱ्यांच्या विरूध्द गोंदिया शहर पोलिसात लोकप्रतिनिधी अधिनियम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रशिक्षणाला बुट्टी मारणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: October 13, 2014 23:21 IST