गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडावर मास्क हे सर्वात प्रभावी शस्त्र मानले जात असून, आजही मास्कचा नियमितपणे वापर करण्याबाबत सांगितले जात आहे. मात्र, मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप असताना मास्क न लावताही कित्येक नागरिक फिरत असल्याने त्यांच्यावर ५०० रुपये दंड ठोठावला जात होता. आता त्यात सूट देण्यात आली असून, ५०० रुपयांऐवजी १०० रुपये दंड आकारला जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आदेश काढले आहेत.
मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप चांगलाच फोफावला असताना तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवर जोमात कारवाई केली जात होती. कोरोनाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव तोंडातून उडणाऱ्या तुषारांपासून होत असल्याने तोंडावर मास्क हेच प्रभावी शस्त्र आहे. मात्र, त्यानंतरही कित्येक नागरिक याकडे दुर्लक्ष करीत होते. यावर मास्क न वापरणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येत होता. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री अनिल देशमुख यांनी मास्क लावणाऱ्यांवर १०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता मास्क न लावणाऱ्या तसेच शारीरिक अंतराचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार असून, यासाठी जिल्हाधिकारी मीना यांनी गुरुवारी (दि. २८) आदेश काढले आहेत.