साकोली : नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या जांभळी (खांबा) परिसरात मागील १५ दिवसांपासून आतंक माजविणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी सहा दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, आज गुरुवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा बिबट्या जांभळी परिसरात लावण्यात आलेल्या एका पिंजऱ्यात अडकला आणि वनविभागाचा जीव भांड्यात पडला. साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) हे गाव जंगलाला लागून आहे. येथील ग्रामस्थांच्या २० च्यावर शेळ्यांना या बिबट्याने मारले होते. ३१ आॅक्टोबरच्या रात्री घराच्या पडवीत झोपून असलेल्या मळाबाई बावणे या वृद्ध महिलेच्या नरडीचा घोट घेऊन या बिबट्याने तिला फरफटत ऊसाच्या वाडीत नेले होते. सकाळी तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर जांभळी येथे वनविभागाविरुद्ध संताप पसरला होता. बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे जांभळीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वनअधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्थिती आटोक्यात आली. त्यानंतर या बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाने वनकर्मचाऱ्यांसह राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात केले. त्यानंतर जांभळी गावाच्या सभोवताल सहा पिंजरे आणि कॅमेरे लावण्यात आले होते. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या एका पिंजऱ्यासमोरुन जाताना काल बुधवारला, रात्रीच्या सुमारास हा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला होता.बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्याचे दिले होते आदेश साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील महिलेला ठार केल्यानंतर ‘त्या’ बिबट्याला ठार मारण्याची मागणी खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशीवार यांच्यासह ग्रामस्थांनी या नरभक्षक बिबट्याला ठार करा, अशी मागणी केली होती. दरम्यान, प्रधानमुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ठार मारु नका, तर बिबट्याला बंदुकीच्या सहाय्याने बेशुद्ध करून जेरबंद करा, असे आदेश जारी केले होते. त्यामुळे या बिबट्यावर निगरानी ठेवण्यासाठी ठिकठिकाणी मचान बांधण्यासाठी साहित्य आणून ठेवण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)
अखेर बिबट अडकला पिंजऱ्यात
By admin | Updated: November 8, 2014 01:26 IST