मागण्या अंशत: मंजूर : तहसीलसमोर आज रस्ता रोकोअर्जुनी-मोरगाव : दोन सावकारांविरूध्द अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी गुन्हे नोंदविल्याने शिवसेनेचे तालुका उपप्रमुख मोरेश्वर सौंदरकर यांनी आमरण उपोषण मागे घेतले तर सामाजिक कार्यकर्ते विजय खुणे व हिराजी बावने यांचे उपोषण सुरूच आहे. शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याची माहिती खुणे व बावणे यांनी एका पत्रकाद्वारे प्रशासनाला दिली. प्राप्त माहितीनुसार, बनावट पावत्या देऊन सोने तारण ठेवणाऱ्या सावकारांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच स्थानिक पोलीस स्टेशनअंतर्गत अवैध धंदे बंद करण्यासाठी सौंदरकर यांनी सोमवारी (दि.८) उपोषण सुरू केले होते. दोन सावकारांविरूध्द गुन्हे दाखल होताच त्यांनी गुरूवारला (दि.११) उपोषण सोडले. सहायक निबंधक संजय सुरजुसे यांनी लिंबूपाणी पाजल्यानंतर उपोषणाची सांगता झाली. यावेळी तहसीलदार बाम्बोर्डे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर उपस्थित होते. खुणे व बावणे यांनी दुसऱ्या शामियानात विविध मागण्यांसाठी उपोषण आरंभले होते. त्यांच्या उपोषणाचा गुरुवारी (दि.११) चौथा दिवस आहे. दोन सावकारांवर गुन्हे दाखल झाले असले तरी अद्यापही बनावट पावत्या देऊन सोने तारण ठेवणारे अनेक सावकार आहेत. बनावट पावत्यांमुळे शेतकरी सावकारी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत. त्या सर्वांवर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करावे, शिवाय अतिवृष्टीत पडझड लाभार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही. या प्रकरणाची पुनचौर्कशी करून दोषींवर कारवाई करावी या मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केले. सावकारांवर गुन्हे दाखल केल्याची लेखी माहिती त्यांना देण्यात आली. मात्र यावर त्यांचे समाधान झाले नाही. मागण्या मान्य न झाल्यास १२ फेब्रुवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचे पत्र त्यांनी प्रभारी उपविभागीय दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक व सहाय्यक निबंधकांना १० फेब्रुवारी रोजी दिले. मात्र अंशत: मागण्या मान्य झाल्यामुळे शुक्रवारला आयोजित रस्ता रोको आंदोलन होतो किंवा नाही याबाबत अनिश्चितता आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोन सावकारांविरूध्द गुन्हे दाखल
By admin | Updated: February 12, 2016 02:07 IST