नवेझरी : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने खरीप पिकांना अगोदरच झळ बसली आहे. आता भातपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भाताचे पीक सुकू लागले. परंतु चोरखमारा जलाशयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे कालव्याचे पाणी शेतासाठी मिळेनासे झाले. या प्रकाराने नवेझरी, मुरमाडी, खैरी, नवेगाव येथील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. गोंदिया जिल्ह्याची भाताचा व तलावाचा जिल्हा अशी ओळख आहे. यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला असून दोन महिने उशीरा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे भाताची रोवणी उशीरा का होईना कसीबसी शेतकऱ्यांनी आटोपली. महाग बियाणे, भरमसाठ वाढलेली मजुरी, गगणाला भिडलेले रासायनिक खताचे भाव याचा विचार न करता शेतकऱ्यांनी भात पिकाची रोवणी केली. अधामधात कमी-जास्त पाऊस आल्याने भातपिके डोलू लागले. आता काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या व धान पिकाचे लोंब्या निघण्याच्या वेळेवरच पीक सुकू लागले. चोरखमारा जलाशयाचे पाणी सोडण्याला आठ-दहा दिवस होऊन मुरमाडी व खैरी मायनरला पाहिजे तसा पाणी नसल्याने शेतकरी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. परंतु अधिकारी भेटत नाही आणि भेटलेच तर पाणी वाढवितो म्हणून सांगतात मोकळे होतात. पण मुरमाडी, खैरी मायनरला पाणी वाढतच नाही. पाण्यासाठी शेतकरी दिवस रात्र जागतात. पण पाणी मिळत नसल्यामुळे आल्या पिकावर शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जबाजारीच होईल. (वार्ताहर)
शेतात पडल्या भेगा
By admin | Updated: October 15, 2014 23:20 IST