शेतीपंप चालणार सुरळीत : घेतली शेतकऱ्यांची बैठक गोंदिया : जिल्ह्यात यंदा रबी पीक घेतले जात असल्याने मोटारपंपावर लोड येत आहे. कमी दाबामुळे अनेक मोटारपंपांत बिघाड होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वीज वितरण कंपनीने १४ उपकेंद्रांवर २५ एमव्हीएआरचे तर ११ केव्ही लाईनवर ७५ ठिकाणी ३६ एमव्हीएआरचे कॅपेसिटर बसविले आहे. त्यामुळे आता काही शेतकऱ्यांंना शेतपिकाला सहजरीत्या पाणी देण्यासाठी मदत होत आहे. विजेच्या कमी दाबाने मोटारपंपांत बिघाड येतो. तसेच ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती, एलटी लाईन, जम्परींगची दुरूस्ती करण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून केले जाते. कमी दाबावर तात्पुरता तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पंपाला कॅपेसिटर बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता जे.एम.पारधी, अधिक्षक अभियंता लिलाधर बोरीकर, देवरीचे कार्यकारी अभियंता संजय वाकडे व सहाय्यक महाव्यवस्थापक असीत ढाकणेकर यांंनी अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या कोसमतोंडी येथे २०० शेतकऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत कमी दाबामुळे मोटारपंप निकामी होऊ नये यासाठी कॅपेसिटर लावण्याचे आवाहन करण्यात आले. या कॅपेसिटरमुळे इलेक्ट्रीक सिस्टमला आवश्यक रिअॅक्टीव्ह कॅम्पेशेसन वाढविण्यास मदत होते.शेतकऱ्यांनी शेतीपंपाला एलटी कॅपेसिटर लावावे. ३ एचपी च्या मोटारपंपला १ केव्हीआर, ५ एचपीच्या मोटारपंपला २ केव्हीआर कॅपेसिटर लावावे, असे मुख्य अभियंता पारधी यांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी) चार तालुक्यातील कमी दाबाच्या समस्येवर समाधान जिल्ह्यातील सडक-अर्जुनी, सालेकसा, गोरेगाव व अर्जुनी-मोरगाव या चार तालुक्यातील एलटी लाईनवर वीज वितरण कंपनीने कॅपेसिटर लावल्यामुळे १० ते १५ व्होल्ट त्वरीत वाढले आहे. त्यामुळे कमी दाबावर तात्पुरता तोडगा काढण्यात काही प्रमाणात यश आल्याचे मुख्य अभियंता पारधी यांनी सांगितले. ११ केव्हीच्या वाहिन्यांवर जास्त लोड येत असल्याने १५० अॅम्पीयर करंट आहे. तेथे लींक लाईन जुळे वाहीणी टाकून लोड बायफरकेट (वाटले) केले जात आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील १५० ते २०० शेतकऱ्यांनी हे कॅपेसिटर बसविल्यामुळे त्यांच्या कृषीपंपाला आधी ३०० व्होल्ट मिळत होते ते आता वाढून ४०० व्होल्ट मिळत आहे. २०० कृषिपंपाना चोरीची वीज शेतपिकासाठी पाणी देण्यासाठी कृषीपंपाना २०० ठिकाणी चोरीची वीज वापरण्यात आली होती. ती चोरी वीज वितरण कंपनीने उघडकीस आणली. मार्च महिन्यात शेतीपंपाच्या ७५ चोऱ्या उघडकीस आणल्या. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला. कृषीपंप धारकांकडून १ कोटी रूपये शेतकऱ्यांकडून मार्च महिन्यात वसूल करण्यात आले. कुलरचा अपघात टाळण्यासाठी हे करा दरवर्षी उन्हाळ्यात कुलरच्या अपघाताच्या घटना होतात. या घटना टाळण्यासाठी कुलरला थ्रीपीनचा वापर करावा, अर्थिंग मजबूत असावे, विद्युत प्रवाह घटनेच्या वेळी खंडीत होईल अशी उपकरणे बाजारात सहज उपलब्ध आहेत त्यांचा स्वीकार केल्यास घटना टाळता येतात. कुलरचा संपर्क जमीनीशी ठेवा, कुलरमध्ये पाणी भरताना विद्युत पूरवठा करणारा प्लग काढून ठेवा व त्यानंतरच पाणी भरा, वीज तार पाण्यात जाणार नाही याची काळजी घ्या, पाणी जमीनीवर पडणार नाही याची काळजी घ्या, कुलरच्या तारांची दररोज पाहणी करा, बालक किंवा कुणीही व्यक्ती कुलरला हात लावून नये, ओल्या होताने किंवा खाली पायाने कुलर चालू करू नये, अशी काळजी घ्यावी.
कमी दाबापासून सुटकेसाठी बसविले ८९ कॅपेसिटर
By admin | Updated: April 17, 2017 01:03 IST