तिरोडा : केंद्र शासनाने पूर्ण देशभर मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतलेला आहे. सन २०१५-१६ ते सन २०१७-१८ या तीन वर्षाच्या कालावधीत संपूर्ण शेतकऱ्यांचे माती पृथ:करण केले जात आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वाटप मंगळवारी मौजा करटी येथे करण्यात आले.तालुका कृषी अधिकारी तिरोडा अंतर्गत ओलीत क्षेत्रात २.५० हेक्टरकरिता १ व कोरडवाहू १० हे.क्षेत्राकरिता १ याप्रमाणे माती नमुने घेण्यात येत आहे. तिरोडा तालुक्यात मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत सन २०१५-१६ करिता क्षेत्रानुरुप ओलीत व कोरडवाहू क्षेत्राच्या ३० टक्के नमुने गोळा करुन प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहे. उपरोक्त अभियानाच्या अनुषंगाने मौजा-करटी (बु.) येथे आरोग्य पत्रिका वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उद्घाटन जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी मातीचे पूजन करुन केले. यावेळी त्यांनी मृद आरोग्य पत्रिका नुसार शेतकऱ्यांनी शेती करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कपुरचंद पटले, प्रगतीशील शेतकरी गुलाब बघेले, लेखीराम चौधरी, धनराज अंबुले, एस.एम. नवलाखे, आर.पी. मांडवे, पी.व्ही. पोटदुखे उपस्थित होते.मृद आरोग्य पत्रिका अभियान शासनाची भूमिका शेतकऱ्याचा सहभाग कृषी उत्पादन पूर्ण क्षमतेने घेण्याकरिता मृद पृथ:करणाचे महत्व त्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी दिली. कार्यक्रम समन्वयक नवलाखे यांनी जमिनीची आरोग्य घटकाची व कमी अधिक असलेल्या घटकामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम व अधिक उत्पादनाकरिता समतोल खताचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत मौजा करटी (बु.) येथे १२४ आरोग्य पत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते उपस्थित शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. संचालन पी.डी. हरिणखेडे यांनी केले. आभार के.आर. रहांगडाले यांनी मानले.
मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप
By admin | Updated: December 12, 2015 04:32 IST