गोंदिया : राज्य शासनाच्या गतिमान पाणलोट विकास योजनेंतर्गत नाल्यांतील पाणी अडविण्यात येते. या योजनेमुळे गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथील दहापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पूर्वी कोरडवाहू शेतीत हरितक्रांती करण्याचा योग घडविण्याची संधी प्राप्त झाली. यातून शेतकऱ्यांना विकासाची संधी प्राप्त झाल्याचे बोलले जाते.गोरेगाव तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी चोपा अंतर्गत तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावरील कलपाथरी गावात गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाचा प्रयोग राबविण्यात आला. संरक्षित ओलिताची सोय करणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवून पाण्याचे दुर्भिक्ष कमी करणे व बागायती क्षेत्रात वाढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.परिसरातील इतर गावांच्या तुलनेत कलपाथरी या गावातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या उद्देशाने त्या गावाची निवड करण्यात आली. कलपाथरी येथे योजनेंतर्गत चार बोड्या, तीन शेततळे आणि दोन माती नाला बांध यांची प्रस्तावित कामे पूर्ण करण्यात आली. या कामांमुळे ३० ते ४० हेक्टर क्षेत्रात संरक्षित ओलिताची सोय उपलब्ध झाली. यापैकी माती नाल्याच्या बांधकामासाठी सर्वाधिक सिंचन उपलब्ध झाले. नाल्यावरील बांधामुळे खेतराम ढोरे, विश्वनाथ मेश्राम, छोटेलाल बिसेन, शोभेलाल भोयर आणि समस्त शेतकऱ्यांना भात पिकाकरिता सिंचन उपलब्ध झाले. नाला बांधाकामासाठी लांबी ७७ मीटर असून पाणी साठविण्याची उंची २.७० मीटर आहे. बांधाची उंची ४.६० मीटर असून एकूण पाण्यासाठी १५.५० टीसीएस एवढा आहे. यामुळे सुमारे १० ते १२.५० हेक्टर क्षेत्राला सिंचन उपलब्ध झाले. शिवाय या परिसरातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीतदेखील वाढ झाली. या आधारावर रबीच्या उत्पन्नात वाढ झाली.
शेतकऱ्यांना मिळाली विकासाची दिशा
By admin | Updated: November 11, 2014 22:44 IST