गोंदिया : गोंदिया तालुक्यातील इर्री येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांच्यावर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत, त्यांच्या खासगी शेतातील झोपडी प्रशासनातर्फे जमीनदोस्त करण्यात आली, परंतु या कारवाईत त्या शेतकऱ्याचे जीवनावश्यक वस्तूही प्रशासनाने जप्त केल्यामुळे त्या आपदग्रस्त शेतकरी कुटुंबाला उपाशीपोटीच रात्र काढावी लागली. प्रशासनाच्या या अमानवीय कारवाईचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून, जीवनावश्यक वस्तू जप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी या शेतकरी कुटुंबाने लावून धरली आहे.
मंडळ अधिकारी एम.बी.रघुवंशी, सहायक गटविकास अधिकारी डी.एम खोटेले, पंचायत विस्तार अधिकारी डी.आर. लंजे यांनी प्रशासनाच्या आदेशानुसार, या शेतकऱ्याच्या शेतातील निवासस्थान असलेली झोपडी शुक्रवारी जमीनदोस्त केली. या निवासस्थानी जीवनावश्यक वस्तू असलेले तांदूळ, गहू, गव्हाचे पीठ, तुरडाळ, धान व इतर वस्तू जप्त केल्या. या वस्तू जीवनावश्यक असल्यामुळे त्या आपद्ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला देणे भाग होते, परंतु या अधिकाऱ्यांनी तसे न करता, त्या सर्व जीवनावश्यक वस्तू जप्त करून त्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. पुढील आदेश येईपर्यंत त्या कोणालाही देण्यात येऊ नये, असे लेखी आदेशही दिले. घरातील असलेले अन्नधान्य प्रशासनाने जप्त केल्यामुळे व घरात कोणतेही इतर धान्य उरले नसल्यामुळे त्या शेतकरी कुटुंबाला उपाशीपोटीच रात्र काढावी लागली. या कृतीचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून, या प्रकरणी दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
.........
माझी झोपडी जमीनदोस्त करताना मला अन्नधान्यही अधिकाऱ्यांनी नेऊ दिले नाहीत. त्यामुळे माझे मोठे नुकसान झाले असून, माझ्या कुटुंबाला रात्रभर उपाशी राहावे लागले.
- ओमकार नंदलाल दमाहे, शेतकरी
..........