लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : यंदा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचे नुकसान झाले होते. तर अतिवृष्टीमुळे घरांची सुध्दा पडझड झाली होती. पुराचा सर्वाधिक फटका गोंदिया व तिरोडा तालुक्यातील ४० गावांना बसला होता. या नुकसान भरपाईपाेटी शासनाने नुकतीच २ कोटी ७० लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. या मदतीचे वाटप दिवाळी पूर्व आपदग्रस्तांना वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निमार्ण होवून १३४५ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. भरपाईपोटी शासनाने २ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. अतिवृष्टीमुळे घरांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यासाठी ३२ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
मदतीतून वसूली न करण्याचे आदेशशासनाने अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून झालेल्या नुकसानी करिता २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र या निधीतून बॅंकांनी कुठल्याच रक्कमेची वसुुली न करता संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले आहे. या मदतीचे वाटप सुध्दा सुरु झाले आहे.
पडझड झालेल्या घरांकरिता दीड काेटीजिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण होवून घर व गोठ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. यासाठी १ कोटी ५३ लाख ९४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. घरगुती साहित्याचे ३२ लाख ९ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. मात्र झालेल्या नुकसानीच्या तुलनेत शासनाकडून मिळालेली भरपाई फार कमी आहे.
शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी मदत मंजूर केली आहे. तहसील कार्यालयाने नुकसानीची रक्कम आली असल्याचे सांगितले. मात्र अजूनपर्यंत आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही.- लिखीराम नागपूरे, शेतकरीलोधीटोला