जीवनमान उंचावण्यास मदत : शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात होणार वाढगोंदिया : मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अनिश्चित व कमी झाल्याने कोरडवाहू शेती मुख्यता पावसावर अवलंबून असल्याने त्याचा विपरित परिणाम पिकांवर आणि उत्पादनावर झाला आहे. शेतीच्या उत्पादनात शाश्वतता आणणे तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहे. पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी जलसंवर्धन आणि पाणलोटच्या माध्यमातून सिंचनाची उपयुक्तता वाढविण्यासोबत संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यातून हरितक्रांतीकडे वाटचाल करण्याचा संकल्प कृषी विभागाने केला आहे.शेततळ्यांच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शेततळे ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी ठरणार आहे. शेततळे कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. त्या शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. जेणेकरु न पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी शेततळे, सामूदायिक शेततळे किंवा भात खाचरेसोबत तयार होणाऱ्या बोडीचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला, दारिद्र्य रेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या वारसांना निवड प्रक्रीयेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट व प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच या व्यतिरिक्त प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्याने निवड करण्यात येईल.मागेल त्याला शेततळे या योजनेमुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यास मोठीच मदत होणार आहे. मागील पाच वर्षात एक वर्ष तरी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांमधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. शेतकऱ्यांना १५ बाय १५ बाय ३ मीटर, २० बाय १५ बाय ३ व ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराचे शेततळे घेता येईल. अनुदानाची कमाल मर्यादा ५० हजार रुपये इतकी राहणार आहे. यापेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याला खर्च करावी लागणार आहे. जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकित्रतरित्या सामूदायिक शेततळे सदर आकारमानाचे तयार करता येईल. त्यांना मिळणारे अनुदान, पाण्याचा वापर आणि पाण्याची हिस्सेवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करार करु न तो अर्जासोबत शेततळे तयार करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा सातबारा, ८ अ चा उतारा, दारिद्र्य रेषेखालील कार्ड/ आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे अर्ज तथा सहमती आवश्यक आहे. अर्जाची मागणी आॅनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची आहे. यासाठी अर्ज संकेतस्थळावार उपलब्ध असून ४५ दिवसांच्या आत अर्ज आॅनलाईन भरणे आवश्यक आहे. यासाठी अर्जदार स्वत: किंवा सायबर कॅफेतून संगणकाचा वापर करून अर्ज भरु शकतो. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले. (प्रतिनिधी)
शेततळ्यातून हरितक्रांतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2016 1:52 AM