बाराभाटी : जवळील ग्राम चान्ना येथे अनिकेत समाजकार्य महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे १९ दिवसांचे वार्षिक क्षेत्रकार्य यशस्वीरित्या पार पडले आहे. यानिमित्त त्यांना आरोग्य विभागाकडून निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकिरी डाॅ. श्वेता कुलकर्णी, डॉ. नाकाडे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रमुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राला पद्मश्री मदर टेरेसा यांचे छायाचित्र विद्यार्थ्यांनी भेट दिले. या क्षेत्रकार्यात विद्यार्थ्यांनी बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, कुष्ठरोग, नेत्रविभाग, क्षयरोग नियंत्रण कक्ष, राष्ट्रीय असंसर्गजन्य विभाग तसेच कामकाज कसे चालते, कार्यालयीन कामाचा अनुभव, औषधी वितरण कक्षाचा अनुभव, त्याचप्रमाणे अनेक रुग्णांशीसुद्धा हितगूज करुन आपल्या क्षेत्रकार्याचा हा १९ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. सूत्रसंचालन बोरकर यांनी केले. महिमा शहारे हिने आभार मानले. कार्यक्रमासाठी अंकित डोंगरे, वंदना चिमनकर, पराग शेंडे, टुकेश्वर चामलाटे या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.