गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये वाहकांकडून तिकीटयंत्रांचा वापर करून प्रवाशांना तिकीट दिले जाते. मात्र या यंत्रांमध्ये दर दोन दिवसांत बिघाड होत असल्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यासाठी जुन्या पंचिंग यंत्राचा उपयोग करावाच लागत आहे. या प्रकारामुळे वाहकांसह प्रवाशांनाही मन:स्ताप सहन करावा लागत आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आय.पी. लिमिटेड कंपनीसह पाच वर्षांचा करार करून तिकीट यंत्रे पुरविली होती. या तिकीट यंत्रांमध्ये काही बिघाड झाला तर सदर कंपनी ते दुरूस्त करून देते. गोंदिया आगारातील यंत्रांचा सदर कंपनीसह असलेला कंत्राट १० डिसेंबर २०१४ रोजीच संपला होता. परंतु एसटी महामंडळाने काही कार्यवाही करून एक वर्षाचा वाढीव कालावधी (एक्सटेंडेड पिरिआॅड) मिळवून घेतला. त्यामुळे सदर यंत्रांमध्ये लहान-मोठा काहीही बिघाड झाला तर सदर कंपनीमार्फत ते दुरूस्त करून दिले जाते. गोंदिया आगारात ही तिकीट यंत्रे ११८ होती. यापैकी एक यंत्र तिरोडा आगाराला देण्यात आला आहे. तर आणखी एक यंत्र बसखाली पडून निकामी झालेला आहे. त्यामुळे गोंदिया आगारात सद्यस्थितीत एकूण ११६ तिकीटयंत्रे आहेत. तर तिरोडा आगारात ६० ते ६५ च्या संख्येत ही तिकीटयंत्रे आहेत. या यंत्रांमुळे प्रवाशांना तिकीट घेणे व वाहकांनाही तिकीट देणे सोईचे ठरले आहे. मात्र या यंत्रांमध्ये दर दोन-तीन दिवसांत होणाऱ्या बिघाडामुळे नाईलाजास्तव वाहकांना जुन्या पंचिंग मशिनचा वापर करण्यास भाग पडावे लागत आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी एसटीच्या बसेसमध्ये पंचिंग केलेले तिकीट मिळत होते. सन २००९ मध्ये टीटीआयएम मशिनचा वापर सुरू झाला. जा यंत्रांमध्ये मार्गावरील टप्पे व तिकीट दर नोंदवून वाहकांना सोपविले जाते. प्रवास मार्गावर तिकीट देण्यासाठी वाहक त्यांचा वापर करतात. तसेच पासधारकांच्या पासची नोंदणीसुद्धा त्याद्वारे केली जाते. वाहन तपासणीवेळी व हिशेब सादर करताना एका क्लिकवर संपूर्ण माहिती मिळते. मात्र आता या यंत्रांमध्ये दर दोन-तीन दिवसांत बिघाड होत असल्याने समस्या निर्माण होते.तिकीट बाहेर न येणे, मध्येच हँग होणे, वेळ बदलणे आदी बाबींमुळे वाहकांची डोकेदुखी वाढून प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अधूनमधून जुन्या पद्धतीचा अवलंब प्रवाशांना तिकीट देण्यासाठी दर दोन-तीन दिवसांत करावाच लागत आहे.(प्रतिनिधी)
वाहकांकडील तिकीट यंत्रांमध्ये दर दोन दिवसांत बिघाड
By admin | Updated: May 21, 2015 01:03 IST