गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. आधी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर नंतर आता कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या फॅबिफ्यू या औषधाचा जिल्ह्यात दोन दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची या औषधासाठी धडपड सुरू आहे. याच धडपडीत दोन रुग्णांना वेळीच हे इंजेक्शन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. एवढी बिकट अवस्था सध्या जिल्ह्याची आहे.
शासकीय व खासगी कोविड रुग्णालयातील बेड्स सध्या हाऊसफुल्ल आहे. एक बेड रिकामा होता त्यासाठी पाच ते सहा जण वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचे बेडसुद्धा हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाच-सहा रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. यात बऱ्याच रुग्णांचा मृत्यू होत आहे. कामठा येथील एका रुग्णाला मंगळवारी वेळीच बेड न मिळाल्याने मृत्यू झाला, तर गोंदिया येथील खासगी नॉनकोविड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन वेळीच न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अनेक रुग्ण तर या सर्व भीतीपोटी रुग्णालयात चाचणी करण्यासाठी जातच नसून त्यांचा उपचाराअभावी घरीच मृत्यू होत आहे. शासकीय मृत्यूचे आकडे हे दोन आकडी असले तरी जिल्ह्यात दररोज मृत्युमुखी पडणाऱ्यांचे योग्य ऑडिट केल्यास हे आकडे आश्चर्यकारक असतील यात शंका नाही. एवढी बिकट अवस्था सध्या जिल्ह्यात आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांना दिले जाणारे फॅबिफ्यू औषध उपलब्ध नाही. रुग्णांचे नातेवाईक मेडिकलच्या पायऱ्या झिजवून औषध आले म्हणून विचारणा करीत आहेत. मात्र वरूनच पुरवठा होत नसल्याने मेडिकल विक्रेत्यांचासुद्धा पर्याय नाही. दोन-तीन दिवसात या सर्व गोष्टींचा वेळीच पुरवठा सुरळीत झाला नाही तर जिल्ह्यात अधिकच बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
..........
कोविड-नॉनकोविडच्या वादात रुग्णांचा बळी
कोरोनाबाधितांची संख्या दररोज तीन आकड्यात वाढत आहे. यात गंभीर रुग्णांची संख्यादेखील अधिक आहे. शासकीय रुग्णालय आणि खासगी कोविड रुग्णालयात सध्या बेड मिळणे म्हणजे देव पावल्यासारखीच स्थिती आहे. मात्र गंभीर रुग्णांना घरी ठेवणेसुद्धा शक्य नसल्याने कुटुंबीय नॉनकोविड रुग्णालयात दाखल करीत आहेत. पण या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने मोठी अडचण होत आहे. अशातच श्रीनगर येथील रुग्णाचा इंजेक्शन न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासनाने ही सर्व परिस्थिती पाहता नियम थोडे शिथिल करण्याची गरज आहे.
...............
परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सुविधेत वाढ होणार का?
जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहे. पालकमंत्र्यांनी आठ दिवसात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र चार दिवसांचा कालावधी लोटूनही या सुविधांमध्ये कसलीच वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर यात सुधारणा होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.