गोंदिया : मोदी सरकारच्या एक वर्षाच्या अयशस्वी कार्यकाळाने देशात निराशेचे वातावरण आहे. त्यामुळे हीच संधी साधून कार्यकर्त्यांनी गटबाजी सोडून जोमाने कामाला लागावे, असे आवाहन कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने रविवारी (दि.३१) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यकर्ता मेळावा व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूक लढण्यास इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी जिल्हा निवड समितीची सभा येथील अग्रसेन भवन मध्ये घेण्यात आली. या सभेला माजी प्रदेशाध्यक्ष ठाकरे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीने नियुक्त केलेले जिल्हा प्रभारी कृष्णकुमार पांडे, लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आमदार रामरतन राऊत, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. के.आर.शेंडे, रजनी नागपुरे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपाल गुलाटी, विनोद जैन प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, उद्योगपतींसाठी काम करणाऱ्या सरकारला गरिबांची भूक व अश्रू दिसत नाही. त्यात आता प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये देण्याचे खोटे आश्वासन देणारे प्रधानमंत्री बीमा करून दोन लाख रूपये देण्याची गोष्ट करीत आहेत. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका बघता भाजप सरकारने २५० रूपयांचे बोनस घोषीत केले. मात्र त्याला आता उशीर झाला आहे. कारण शेतकऱ्यांचे धान आता व्यापाऱ्यांच्या हातात गेले आहे. याच राज्य सरकारने सुमारे साडे तीन कोटींचे जिल्हा परिषदेचे काम रद्द केले आहेत. त्यामुळे जनतेला खोटे स्वप्न दाखविणाऱ्यांची सरकार आता बनू नये. यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर करून कामाला लागण्याचे आवाहन केले. संचालन महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. मेळाव्याला जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. झामसिंह बघेले, महासचिव पी.जी.कटरे, अशोक लंजे, राजेश नंदागवळी, बाजार समिती उपसभापती धनलाल ठाकरे, सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे, एनएसयुआय अध्यक्ष संदीप रहांगडाले, जिल्हा परिषद पक्ष नेता डॉ. योगेंद्र भगत, जिल्हा बँक उपाध्यक्ष राधेलाल पटले, तालुका अध्यक्ष प्रकाश रहमतकर, देवेंद्र तिवारी, डोमेंद्र रहांगडालेसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गटबाजी सोडून पूर्ण जोमाने कामाला लागा
By admin | Updated: June 3, 2015 01:17 IST