सालेकसा : स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही देशातील आदिवासी समाजाची लूट थांबली नसून आजही त्यांचे हक्क व जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर शासनाकडून मात्र ठोस पाऊल उचलले जात नाही. म्हणून अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी माजी सैनिकांनी तहसील कार्यालयासमोर अनिश्चितकालीन धरणे आंदोलन सुरु केले आहे.
नवाटोला येथे आदिवासींच्या जमिनीवर पेट्रोल पंप उभारण्यात येत असून त्यांची हक्काची जमीन बळकावण्याचे काम करीत असल्याचे सांगत जमीन मालक हमीलाल छोटेलाल मडावी यांच्या परिवारासह तालुक्यातील माजी सैनिकांनी कोरोना नियमांचे पालन करीत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आदिवासींच्या परवानगीविना त्यांची जमीन हडप केली जाते ती थांबवावी, मूळ आदिवासी असून सुध्दा शासनातील लोक आदिवासी असल्याचे वेगवेगळे प्रमाणपत्र मागत असतात तसेच जमिनीच्या पट्ट्यात हेराफेरी करीत महसूल विभाग अचूक माहिती न देणे या व इतर अनेक समस्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून त्यांनी हे धरणे आंदोलन सुरु केले आहे.
रविवारी (दि.२८) होळीचा दिवस व सुटीचा दिवस असून सुध्दा धरणे आंदोलन सतत सुरु ठेवण्यात आले आहे. दरम्यान तहसील कार्यालयात शुकशुकाट असून आंदोलन करणाऱ्यांची दखल केव्हा घेतली जाईल याबाबत काही सांगता येत नाही.