केशोरी : कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून या लाटेची तीव्रता वाढत आहे. यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा तालुका आरोग्य यंत्रणेबरोबर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज झाली असून अर्जुनी-मोरगाव तालुक्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकावर असल्याने अत्यंत चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी निष्काळजीपणा न करता सतत मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी केले.
येथील नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली जात असून याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. डॉ. मंडल यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सेवक हाके यांचे पथक विद्यार्थ्यांचे नमुने घेत आहेत. विद्यार्थीसंख्या जास्त असून चाचणीच्या किट्स कमी उपलब्ध होत असल्यामुळे दररोज फक्त ५० विद्यार्थ्यांची चाचणी करणे सुरू आहे. जास्त किट्स उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या कोरोनाची तीव्रता वाढत आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत:च घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. मंडल यांनी केले आहे. या वेळी प्राचार्य नरेंद्र काडगाये, पर्यवेक्षक हिवराज साखरे, प्रा. मुरलीधर मानकर, प्रा. दिनेश नाकाडे, प्रा. विक्रांत मोहबंशी, प्रा. चैतराम कापगते, जे.पी. मेश्राम, एम.ए. पाऊलझगडे, श्रीनिवास कॉलेजवार, आस्तिक वाघमारे, दिलीप हलमारे प्रामुख्याने उपस्थित होते.