चिमुकला हरविल्याची घटना : चौघांनी उचलून नेल्याचे सांगतो विनीत गोंदिया : घरासमोर खेळत असलेला सहा वर्षीय चिमुकला अचानकच गायब झाल्याने परिसरासह शहरात रविवारी (दि.२६) एकच खळबळ माजली होती. तर रात्री ९ वाजता दरम्यान चिमुकला घरी परतला असून चौघांनी उचलून नेल्याचे त्याने सांगीतले. विशेष म्हणजे त्या चौघा इसमांनी मंदिरांत फिरवून त्यानंतर घरी सोडल्याचे सांगीतल्याने या घटनेला घेऊन वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. शहरातील छोटा गोंदिया परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रतिष्ठीत पंचबुद्धे परिवारासाठी रविवारचा दिवस (दि.२६) दुर्भाग्य व तेवढाच भाग्याचाही ठरला. त्याचे झाले असे की, परिवारातील नुरेश्वर पंचबुद्धे यांचा मुलगा विनीत (६) हा सायंकाळी ४ वाजता दरम्यान घरासमोर खेळत असताना अचानकच गायब झाला. परिवारातील सदस्यांना ही कल्पना येताच त्यांना विनीतचा शोधाशोध सुरू केला. मात्र विनीतचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी घरच्यांनी या दुर्भाग्यपूर्ण घटनेची माहिती पोलिसांत दिली. यावर मात्र लगेच पोलिसांनी तपास कार्य सुरू केले. तर शहरातील रेल्वे स्थानकावरही विनीत हरविल्याबाबत सूचना दिली जात असल्याचे कळले. मात्र रात्री ९ वाजताच्या सुमारास विनीत घरात परत आला. घरातून हरविलेला चिमुकला परत आल्याने घरच्या मंडळीच्या जिवात जीव आला. विनीतने आपल्या घरच्यांच्या सांगीतलेल्या या प्रकारानंतर पंचबुद्धे परिवारच काय तर परिसरात खळबळ माजली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शहरात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रीय झाल्याचेही बोलले जात आहे. आता या प्रकरणात विनीतने घरच्या मंडळीला दिलेल्या माहितीत किती तथ्य आहे हे त्यालाच माहिती. मात्र या प्रकरणाला घेऊन शहर पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी विनीतच्या घरची मंडळी तक्रार द्यायला आली होती. आम्ही त्यांची माहिती घेत असतानाच त्यांना विनीत घरी परतल्याचा फोन आला होता व ते लगेच निघून गेले. त्यानंतर मात्र मला या प्रकरणाबाबत काहीही माहिती मिळाली नाही. किंवा त्यांनीही अद्याप संपर्क साधून माहिती दिलेली नाही. त्यामुळे खरे काय ते कळू शकलेले नसल्याचे सांगीतले.(शहर प्रतिनिधी)
‘त्या’ घटनेने शहरवासीयांत दहशत
By admin | Updated: October 27, 2014 22:37 IST