सालेकसा : येथील वासुदेव कृष्णराव फुंडे यांचे घर उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयाकरिता ऑक्टोबर २०१६ मध्ये भाड्याने घेण्यात आले. ६ हजार ८०० रुपये प्रति महिना भाड्याचा करारनामादेखील करण्यात आला. परंतु, कार्यालय आल्यापासून आजतागायत दमडीदेखील भाड्यापोटी देण्यात आले नाही. भाडे मिळत नसल्याने १ एप्रिल रोजी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा घरमालक वासुदेव फुंडे यांनी दिला आहे.
सालेकसा या तालुका मुख्यालयी मृदा व जलसंधारण विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाकरिता शासकीय जागा उपलब्ध नसल्याने ऑक्टोबर २०१६ मध्ये करारनामा करीत वासुदेव फुंडे यांचे घर कार्यालयाकरिता विभागाने भाडेतत्त्वावर घेतले. दरमहा ६ हजार ८०० रुपये भाड्याचा करार करण्यात आला. दर महिन्याला भाडे देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र भाडे देण्यात येत नाही. भाड्याने इमारत दिल्यानंतर भाडे मिळाले नसल्यामुळे आपल्याला भाडे देण्यात यावे, या मागणीकरिता २०१७ पासून वासुदेव फुंडे विभागाकडे पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र दरवेळी काही ना काही कारण पुढे करून भाडे देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. चार वर्षांपासूनचे भाडे थकले आहे. त्यामुळे वासुदेव चुटे अडचणीत आले आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील या विषयाला घेऊन चालढकल करीत आहेत. २०१७ पासून वासुदेव फुंडे थकीत घरभाड्याकरिता पत्रव्यवहार करीत आहेत, पण अद्यापही त्यांना भाडे देण्यात आलेले नाही. तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असताना सप्टेंबर महिन्यात मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी वासुदेव फुंडे यांना पत्र पाठविले. कार्यालयाकरिता शासकीय इमारत उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्यानंतर थकीत भाड्याच्या रकमेची वरिष्ठांकडे मागणी करण्यात येणार असल्याचे उलट पत्र विभागाने फुंडे यांना पाठविले. दुसरी इमारत उपलब्ध होईपर्यंत सहा महिन्याचा कालावधी देण्यात यावा, असे पत्र जलसंधारण विभागाने वासुदेव चुटे यांना दिले आहे. मात्र आधी थकीत भाडे द्या, अन्यथा १ एप्रिल रोजी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा वासुदेव फुंडे यांनी दिला आहे.