गोंदिया : झाडीपट्टीची मंडई सर्वदूर प्रसिद्ध आहे. भाऊबीजेनंतर जिल्ह्यात गावोगावी मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा गावकरी मनसोक्त आनंद लुटतात. परंतु यानिमित्त विविध सरकारी कार्यक्रम, मोहिमांबद्दल जनजागृती व समाजप्रबोधन करण्याची सुवर्णसंधी असताना त्याबाबत कोणताही विभाग जागरूक असल्याचे दिसत नाही. विविध योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी अशा मंडईंचा योग्य वापर होऊ शकतो. यावर्षी कोणकोणता विभाग त्यासाठी पुढाकार घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दिवाळीनंतर जिल्ह्यातील प्रत्येक गावी मंडई भरविली जाते. या दिवसात शेतकऱ्यांच्या हाती धानाचे उत्पादन आले असते तर त्यांच्या हातात दोन पैसे खेळू लागतात. तीन-चार महिने शेतात राबून शेतकऱ्यांना उसंत मिळाली असते. त्यामुळे मंडईत थोडे मनोरंजन आणि मौजमजा करण्याचा सर्वांचा मूड असतो. यातच काही प्रबोधनपर नाटकांचेही आयोजन अनेक ठिकाणी केले जाते. शासनाच्या योजना किंवा मोहिमांची प्रसिद्धी या मंडईतून प्रभावीपणे होऊ शकते. परंतु त्यासाठी कोणत्याही विभागाकडून पुढाकार घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे.मंडईत गावकऱ्यांसाठी पाहुनपणाला येणारे लोकही मनाजोगी खरेदी करतात. हा मंडई उत्सव जवळपास महिनाभर चालतो. कार्तिक पौर्णिमेपर्यंत मंडईची धूम असते. ज्या गावी मंडई असते, त्या गावातील नागरिक आपल्या नातेवाईकांना मंडईचे निमंत्रण देतात. दिवसभर मंडईचा भरपूर आस्वाद घेतल्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडईनिमित्त प्रामुख्याने दंडार, नाटके, संगीतमय कार्यक्रम, कीर्तन, गोंधळ, तमाशा, लावणी या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहरातील नागरिकसुद्धा या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. मंडईत सादर करण्यात येणाऱ्या लोककलांना चांगला प्रतिसाद मिळत असतो. विशेष म्हणजे घराघरांत पोहोचलेल्या टीव्हीवर सर्व प्रकारचे मनोरंजन होत असले तरी मंडईची मजा काही औरच असते. यानिमित्त घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचा सामूहिकपणे आनंद लुटताना, त्यात गावातील सर्व मंडळी पूर्णपणे समर्पित होताना दिसतात. त्यामुळेच या कार्यक्रमांचा लोकांवर तेवढ्याच तीव्रपणे प्रभाव पडतो. त्यामुळे एखाद्या विषयावर जनजागृती करण्यासाठी किंंवा सरकारी कार्यक्रमांची, योजनांची माहिती देण्यासाठी ही मंडई म्हणजे मोठी पर्वणी असते. परंतु दुर्दैवाने जिल्हा प्रशासनासोबतच विविध विभाग त्याबाबत फारसा पुढाकार घेत नाही. ग्रामस्थांशी संवाद साधण्याचे मंडई उत्सव हे चांगले माध्यम असताना त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता त्यातून प्रबोधन साधल्यास शासनाच्या मोहिमा, अभियान बऱ्याच प्रमाणात यशस्वी होऊ शकते. अत्यंत कमी खर्चात प्रबोधन करता येणाऱ्या या उत्सवाकडे प्रशासन दुर्लक्ष का करते, हे न समजणारे कोडे आहे. (प्रतिनिधी)
मंडईच्या मनोरंजनात समाजप्रबोधनाला बगल
By admin | Updated: October 19, 2014 23:39 IST