पांढरी : शहर असो किंवा एखादे गाव मोकळी जागा दिसल्यास त्यावर अतिक्रमण केले जाते. असाच प्रकार जवळील ग्राम डुंडा येथील राखीव जागेवर काही गावकऱ्यांकडून केला जात आहे. गावातील मोकळ््या जागेवर गावकऱ्यांनी धानाचे पुंजणे तयार केले आहे. यामुळे गावच्या त्या या जागेवर घाण होत असून गावचे वातावरणात प्रदूषित होत आहे. यावर ग्रामपंचायतने अतिक्रमण करणाऱ्या त्या व्यक्तींना नोटीस बजावले आहे. तर गावच्या राखीव जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून जागा मोकळी करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. ग्राम डुंडा येथील मुख्य भागातील राखीव जागेचे हे प्रकरण आहे. गवची ही जागा मोकळी असल्याने गावकरी विविध कार्यक्रम व कामानिमित्ताने या जागेचा वापर करतात. मात्र मागील काही दिवसांपासून गावातीलच काहींनी या मोकळ््या जागेवर धानाचे पुंजणे व खत तयार करण्यासाठी खड्डे खणून अतिक्रमण केले आहे.या प्रकारामुळे मात्र विविध कामांसाठी वापरण्यात येत असलेल्या या जागेवर घाण होत आहे. शिवाय या घाणीमुळे गावचे वातावरण प्रदुषीत होत आहे.विशेष म्हणजे या जागेवरच एक विहीर असून त्या विहीरीचे पाणी गावकरी वापरतात. मात्र या घाणीमुळे विहीरीचे पाणीही दुषीत होत असून तेच पाणी गावकऱ्यांना वापरावे लागत असल्याचेही गावकरी बोलत आहेत. एका वर्षापुर्वी अतिक्रमणाचा असाच प्रकार घडला होता व त्यावर ग्राम पंचायत कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली होती. त्याची तक्रार डुग्गीपार पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. मात्र एवढे होऊनही गावकरी काही ऐकण्यास तयार नाहीत व अतिक्रमणाचा प्रकार सुरूच आहे. गावच्या राखीव जागेवर अतिक्रमण होत असल्याने या प्रकाराला घेऊन गावकऱ्यांत रोष निर्माण आहे. तर या प्रकारावर ग्राम पंचायत कार्यालयाने संबंधीतांना नोटीस बजावले आहे. मात्र जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. एकीकडे शासन गावागावांत स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र येथे गावकरीच गावच्या जागेवर अतिक्रमण करून गावात घाण पसरविण्याचा प्रकार करीत आहे. असे असतानाही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने गावकरी आश्चर्य व रोष व्यक्त करीत आहेत. तरी ग्राम पंचायत कार्यालयाने येथील धानाचे पुंजने, तणस, खताचे खड्डे हटवून गावात होत असलेल्या घाणीवर आळा घालावा. तसेच अतिक्रमण व घाण पसरविण्याचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. (वार्ताहर)
राखीव जागेवर केले गावकऱ्यांनी अतिक्रमण
By admin | Updated: December 13, 2014 22:42 IST