गोंदिया : लघू उद्योगासाठी आकारलेले वीज बिल विद्युत विभागाने कमी करून दिल्यावर ग्राहकाने सदर बिलाचा त्वरित भरणा केला. मात्र यानंतर वर्षभराचा कालावधी लोटूनही वीज विभागाने विद्युत पुरवठा सुरू न केल्याने उद्योगाचा माल निर्मित होवू शकला नाही व ग्राहकाला नुकसान करावे लागले. त्यामुळे त्याने ग्राहक न्यायमंचात धाव घेतली. अखेर सदर ग्राहकाला मानसिक त्रास व वीज पुरवठा खंडित ठेवल्यामुळे २५ हजार रूपये व न्यायालयीन खर्च ५ हजार रूपये ३० दिवसांच्या आत देण्याचे आदेश ग्राहक न्यायमंचचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी विद्युत वितरण कंपनीला दिले.माताटोली गोंदिया येथील रहिवासी दोनिशा नूतन खंडेलवाल यांचे गणेश प्लास्टिक हे लघू उद्योग आहे. त्यासाठी त्यांनी वीज जोडणी घेतली होती. त्याच उद्योगावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी त्यांना केवळ ६२० युनिटचे ३५ हजार ५०० रूपयांचा विद्युत बिल दिला होता. सदर बिल अधिक रकमेचा असल्याचा संशय आल्याने खंडेलवाल यांनी बिल दुरूस्त करून देण्याबाबत अर्ज केला होता. यावर वीज कंपनीने बिल दुरूस्त करून १९ हजार ७३५ रूपयांचा बिल दुरूस्त करून दिला. खंडेलवाल यांनी सदर रकमेचा त्वरित भरणा केला. परंतु एक वर्षाचा कालावधी लोटूनही वीज वितरण कंपनीने त्यांच्या लघू उद्योगासाठी विद्युत पुरवठा सुरू केला नाही. त्यामुळे उद्योगाचा माल निर्मित होवू शकला नाही व उद्योगाचे आर्थिक नुकसान झाले. दोनिशा खंडेलवाल यांनी स्वत:च्या चरितार्थासाठी सुरू केलेल्या व्यवसायास विद्युत वितरण कंपनीने दुरूस्त केलेले बिल वेळेत भरल्यानंतरही व पाच-सहा वेळा वीज पुरवठा सुरू करण्याबाबत लेखी निवेदन देवूनही वीज कंपनीने वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार दाखल केली. तक्रारकर्ती खंडेलवाल यांच्या बाजूने अॅड. प्रकाश तोलानी तर विरूद्ध पक्ष वीज कंपनीच्या बाजूने अॅड. एस.बी. राजनकर यांनी न्यायाधीश अतुल आळशी यांच्यासमोर बाजू ठेवली. ग्राहक न्यायमंचाने त्यांच्या बाजू ऐकून व प्रकरणात सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची चौकशी करून कारणमिमांसा केली. यात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वर्षभरापेक्षा अधिकचा विलंब लागल्याने विद्युत वितरण कंपनीची सेवेतील त्रुटी दिसून आली. त्यावर २५ हजार रूपये नुकसान भरपाई व पाच हजार रूपये न्यायालयीन खर्च विद्युत वितरण कंपनीने ग्राहक दोनिशा खंडेलवाल यांना ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने जारी केला. (प्रतिनिधी)
बिल भरूनही वीज पुरवठा वर्षभर बंद
By admin | Updated: May 27, 2015 01:06 IST