तिरोडा : केलेल्या कामाचे बील काढून देण्याचा मोबदला म्हणून आठ हजार रूपयांची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. गुरूवारी (दि.२८) दुपारी पथकाने ही कारवाई केली आहे. तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जनसुविधा विशेष अनुदानाच्या कामाचे एक लाख ९० हजार रूपयांचे बील मंजूर करवून इंदोरा खुर्दचे ग्रामसेवक देवचंद मंसाराम मेश्राम (४५) याने धनादेश काढून दिले. तर धनादेश काढून देण्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक मेश्राम याने त्यांना आठ हजार रूपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १६ जानेवारी रोजी तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने १८ जानेवारी रोजी इंदोरा खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात पडताळणी केली. यावर ग्रामसेवक मेश्राम याने पंचांसमक्ष लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या आधारावर एसीबीच्या पथकाने गुरूवारी (दि.२८) दुपारी ग्रामसेवक मेश्राम यास अटक केली असून तिरोडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात लाचखोरांविरूद्धची कारवाई सुरूच असून यामुळे लाचखोरीवर बराच आळा बसत आहे. (शहर प्रतिनिधी)
आठ हजारांची लाच भोवली
By admin | Updated: January 29, 2016 04:43 IST