गोंदिया : येथील अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने सडक/अर्जुनी तालुक्यातील बाह्मणी (खडकी) येथील स्वामी रामकृष्ण प्राथमिक आदिवासी शाळेत विद्यार्थ्यांचे शिक्षण व आरोग्य यावर समुपदेशाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. आपल्या आई-वडिलांपासून शिक्षणासाठी दूर आलेल्या मुलामुलींना कार्यक्रमाचा लाभ झाला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भरपूर प्रेम दिले व आपुलकीने राहण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाची सुरूवात स्वागत गीताने झाली. यावेळी मेडीकल सेलचे उपाध्यक्ष शकून बिसेन यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या सात पद्धती व मासीक पाळीबद्दल माहिती दिली. संघटनेच्या राज्यसचिव सविता तुरकर यांनी आत्मरक्षण कसे करावे व मानसिक ताण दूर करण्यासाठी योगा आवश्यक असल्याचे सांगितले. दिव्या तुरकर यांनी विद्यार्थ्यांची प्रश्नावली घेतली. विजय हरिणखेडे यांनी मुलींनी नेहमी समुहाने जावे व एकता जपून ठेवण्याचे आवाहन केले. मनीष तिवारी यांनी गुरूजनांचे आदर यावर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक पी.बी. खोब्रागडे यांनी दिवाळीच्या सणात सावधगिरीने फटाके फोडण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे संचालन एस.ए. फटे यांनी तर आभार हेमलता बन्सोड यांनी मानले.
शिक्षण व आरोग्यावर समुपदेश कार्यक्रमाची सांगता
By admin | Updated: October 3, 2014 01:47 IST