गोंदिया : नगरपरिषद कर विभागाकडून सध्या धडाक्यात वसुलीची मोहीम राबविली जात आहे. यावरून यंदा मालमत्ता कर विभाग रेकॉर्डतोड वसुली करणार असल्याचे दिसत आहे. असे असताना मात्र कर विभागाच्या या वसुली मोहिमेला इलेक्शन ड्यूटीचे ग्रहण लागले आहे. कर विभागातील १८ मोहरीलची मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ड्यूटी लावण्यात आली आहे. यामुळे कर वसुलीवर कोठेतरी परिणाम पडणार आहे.
मालमत्ता कर वसुलीत येणाऱ्या नानाविध अडचणींमुळे मालमत्ता कर विभागाची वसुली होत नाही. परिणामी दरवर्षी थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. यामुळेच यंदा नगरपरिषदेला ११ कोटींच्या घरात कर वसुलीचे टार्गेट आहे. यंदा मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी कर वसुलीत कुणाचीही गय न करता वसुली अथवा कारवाई असे आदेश दिले आहेत. यामुळे कर वसुली पथक जोमाने कामावर लागले असून धडाक्यात वसुली व सोबतच कराचा भरणा न करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. हेच कारण आहे की, पथकाने आतापर्यंत सुमारे साडेचार कोटींच्या घरात कर वसुली करून घेतली आहे. या धडाक्याने कर वसुली राहिल्यास यंदा नक्कीच रेकॉर्डब्रेक कर वसुली होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. असे झाल्यास नगरपरिषदेच्या तिजोरीवरील बोजाही कमी होणार आहे. शिवाय दरवर्षी निर्माण होणारी कर वसुलीची डोकेदुखीही नाहीशी होणार आहे. असे असतानाच मात्र कर वसुलीला इलेक्शन ड्यूटीचे ग्रहण लागले आहे. त्याचे असे की, मालमत्ता कर विभागात कार्यरत १८ मोहरीलची मतदार यादी अद्ययावत मोहिमेत ड्यूटी लावण्यात आली आहे. आता मोहरील नसल्यास कर वसुली कशी करावी असा प्रश्न कर विभागाला पडला आहे.
------------------------------
उरणार फक्त ३ कर्मचारी
नगरपरिषद मालमत्ता कर विभागात आजघडीला १८ मोहरील कार्यरत आहेत. या मोहरीलकडेच त्यांच्याकडे असलेल्या वॉर्डातील संपूर्ण माहिती असते. यात १५ स्थायी असून ३ कंत्राटी तत्वावर घेण्यात आले आहेत. आता या १८ मोहरीलची ड्यूटी लावण्यात आल्याने कर विभागात फक्त १ कर अधिकारी व २ सहायक कर अधिकारी उरणार आहेत. अशात कर वसुलीवर परिणाम जाणवणार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
-------------------------------
सन २०२० सर्वात कठीण
सन २०२० मध्ये मार्च महिन्यातच लॉकडाऊन लागले व तेव्हाच शहरात कोरोना रूग्ण आढळून आला होता. तेव्हापासूनच मोहरीलची फसगत सुरू आहे. कोरोना कालावधीत मोहरीलची कोरोना सर्वेक्षण, कंटेन्मेंट झोन मध्ये ड्यूटी, जनगणना, पोलीस पंच अशी कामे करावी लागत आहेत. यामुळे कर विभागाच्या कार्यावर याचा परिणाम होत आहे.