आमगाव : येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. परंतु बांधकाम दरम्यान उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट रस्ता बांधकाम सुरू झाले आहे. बांधकामात पूर्व रस्त्याचे खोदकाम करून मातीचे ढिगारे उपसा करून अन्य ठिकाणी वाहतूक करण्यात येत आहे. यामुळे देवरी-आमगाव, आमगाव ते लांजी मार्गावर बांधकाम करताना धूळ उडत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या रस्त्याचे बांधकाम शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनी व पटेल कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे करण्यात येत आहे. हे बांधकाम पूर्वीच संथ गतीने सुरू असून दैनंदिन वाहतूक ठप्प झाली आहे. त्यात कंपनीद्वारे बांधकाम करण्यात येणाऱ्या साहित्यात अनियमितपणा केली जात असल्याचे यापूर्वी देखील उघड झाले आहे. रस्त्यावर साचलेले ढिगारे व उडणाऱ्या धुळीवर पाणी मारून धुळवळीवर काही प्रमाणात उपाय करणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे अनेकांना श्वसनाच्या आजाराने ग्रासले आहे.
स्थानिक प्रशासनाने बांधकाम कंपनी विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.