शेतकरी पुन्हा संकटात : गादमाशी, खोडकिडा व करप्याने केले बेजारखातीया : तालुक्यातील कामठा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये धानाच्या रोपांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले असून त्यांची चिंता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.शेतकऱ्यांना धानपिकांच्या रोपांमध्ये गाद, खोडकिडा, करपा यासारखे रोग लागल्याचे दिसून येत आहेत. या रोगांवर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या महागड्या कीटनाशक औषधीचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीपणामुळे मोठेच नुकसान करावे लागले. धान पिकांवर खूप खर्च होत असून त्यांना आर्थिक संकटाशी झुंज द्यावी लागत आहे. धानाचे पीक घरी येईपर्यंत शेतकऱ्यांना धावपळच करावी लागते. पण या वेळी धानपिकावर लागलेले हे रोग रोपांना नष्ट करीत असून धानपीक कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. अशा या संकटाच्या वेळी शासनाच्या वतीने या विविध रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी कीटनाशक औषधी मोफत पुरविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. आर्थिक संकटाच्या समस्येतून ही मदत थोड्याफार प्रमाणात बचाव करू शकेल, असे खातिया येथील उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते सुरजलाल खोटेले यांनी कळविले आहे. (वार्ताहर)
धानाच्या रोपांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव
By admin | Updated: September 21, 2015 01:43 IST